Kharda Fort : खर्डा किल्ल्याच्या जतन प्रक्रियेच्या कार्यवाहीस गती द्या – सभापती राम शिंदे यांचे मुंबईतील बैठकीत निर्देश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : खर्डा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाचे जतन/दुरूस्ती करण्याकरिता बगीचा, सुशोभीकरण, संरक्षण भिंत, दरवाजा या बाबींचा नव्याने समावेश करून फेरनिविदा काढण्यात यावी. जलदगतीने काम पुर्ण करण्यासंदर्भातील कामकाजाचा अहवाल पुढील एक महिन्यात सादर करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले.

जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ल्याच्या स्मारकाच्या जतन संदर्भात आज विधीमंडळ येथे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खर्डा किल्ल्याच्या दुरूस्ती संदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, जिल्हा तसेच गाव स्तरावर असलेल्या महावारसा समिती तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचा विचार यातून स्मारकाची डागडुजी व जतन करण्यात यावे असे निर्देश यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिले.

सभापती शिंदे म्हणाले की, स्मारकाच्या ठिकाणी किल्ल्याच्या खंदकातील उर्वरीत भिंत, बुरूज, भिंतीतील खोल्या यांची दुरूस्ती व संवर्धन करणे, तसेच प्रवेश दरवाजा बांधणे, संरक्षित भींत उभारणे, रोशनाई या बाबींचा समावेश करून फेरनिविदा काढण्यात याव्यात. जतन व दुरूस्तीच्या कामांस गती द्यावी.

यावेळी विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पुरातत्व वस्तु संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, सहायक संचालक अमोल गोरे, भाजपा नेते रविंद्र सुरवसे यावेळी उपस्थित होते.