जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बोधी एज्युकेशनल फाउंडेशनचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार बीड जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार अनिल गायकवाड यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच औरंगाबाद (छ.संभाजीनगर) येथे समारंभपूर्वक होणार आहे.
औरंगाबाद (छ.संभाजीनगर) येथील बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या समाजशील पत्रकारांचा गौरव केला जातो. यंदाचा पुरस्कार बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील पत्रकार अनिल गायकवाड यांना देण्याचा निर्णय संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा संस्थेचा सातवा वर्धापनदिन आहे.
शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह सन्मानपत्र सन्मान फेटा आणि ग्रंथ प्रदान करून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जानेवारी 2023 मध्ये या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे यांनी दिली आहे.
अनिल गायकवाड हे गेल्या 22 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमांतून सामाजिक, राजकीय, शेती, आरोग्य, धार्मिक, ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर आवाज उठवत त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.त्यांच्या याच कार्याबद्दल बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
अनिल गायकवाड हे सध्या लोकमतचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. गायकवाड यांना पुरस्काराची घोषणा होताच त्यांचे राजकीय, सामाजिक, धार्मिक, पत्रकारिता, शिक्षण, सांस्कृतिक, वैचारिकसह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.