जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जामखेड महसुल विभागाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या महसूल वसुलीच्या टार्गेट पैकी तब्बल 84 टक्के टार्गेट पुर्ण झाले. 31 मार्च अखेर जामखेड महसूल विभागाने 792 लक्ष रूपयांचा महसूल वसूल करण्याची दमदार कामगिरी केली आहे. (Strong performance of Jamkhed tehsil office, revenue of 792 lakhs)
महसूल विभागाने जामखेड तालुक्यासाठी प्रपत्र अ जमीन महसूलासाठी 290 लक्ष तर प्रपत्र ब गौण खनिजसाठी 670 लक्ष असे 960 लक्ष रूपयांच्या महसुल वसुलीचे टार्गेट दिले होते. त्यानुसार 792 लक्ष रूपयांचा महसुल वसुल झाला. यामध्ये जमीन महसूलापोटी 317 लाख तर गौण खनिज पोटी 475 लाख महसूल जमा झाला अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन, प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांचे वस्तुनिष्ठ नियोजन व मार्गदर्शन यामुळे कमी कालावधीचा वेळ मिळूनही जमीन महसूल जमा करण्यास जामखेड तहसील विभागाला मोठे यश आले.
कोवीड परिस्थिती असूनही जमीन महसूल, नजराणा प्रकरण, मोजणी, कुळ कायदा प्रकरण, बिनशेती, शर्तभग, अनाधिकृत एनए, तुकडा नियमाकुल, शासकीय कामे रॉयल्टी, गौंण खनिज दंड, वाहतूक कारवाई या माध्यमातून सदर रक्कम जमा केली असे तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले.
निवासी नायब तहसीलदार मनोज भोसेकर, तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कार्यालयीन कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून सदरचे उद्दिष्ट साध्य करण्यात जामखेड तहसील कार्यालयाला यश आले.