जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । खरं तर कोर्ट कचेरी म्हटलं की, सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहतो, पण शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान असेल तर कायद्याचे रक्षण करणारी पिढी निर्माण होऊ शकते. न्याय व्यवस्थेचा सन्मान अधिक वाढू शकतो. त्यामुळे न्यायालयीन कामकाजाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी कालिका पोदार लर्न स्कूलच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची एक टीम नुकतीच जामखेड न्यायालयात गेली होती. यावेळी न्यायाधीश रजनीकांत जगताप यांच्याशी संवाद साधताना विद्यार्थी चांगलेच रमले होते.
कालिका पोदार लर्न स्कूल जामखेडच्या वतीने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्ट व्हिजिटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य प्रशांत जोशी यांच्यासह अविनाश खेडकर, तुषार संकपाळ, अॅलेक्स फिग्रेडो यांनी विद्यार्थ्यांना जामखेड न्यायालयाची सफर घडवून आणली.
यावेळी कालिका पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांना न्यायालयात कामकाज कसे चालते याची माहिती देण्यात आली. फौजदारी खटल्यांमध्ये सरकारी वकिलाची भूमिका, न्यायाधीश, अभियोक्ता आणि बचाव पक्षाचे वकील खटले कसे हाताळतात याची सविस्तर माहिती देण्यात आली.
न्यायालयाचे काम नेमके कसे चालते हे समजून घेत असताना सर्व विद्यार्थी यावेळी चांगले रमले होते. प्रत्येक बारकावे ते समजून घेत होते. यावेळी सर्वांच्याच चेहर्यावर उत्सुकता दिसून येत होती.
न्यायाधीश रजनीकांत जगताप व इतर अधिवक्त्यांशी विद्यार्थ्यांची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी अर्धा तास न्यायाधीश रजनीकांत जगताप यांच्याशी सविस्तर संवाद साधला. त्यांनी सांगितलेले ज्ञान आणि अनुभव समजून घेताना विद्यार्थी चांगलेच रमून गेले होते.
दरम्यान जामखेड बार असोसिएशनच्या सर्व सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. न्यायालयीन कामकाज कसे चालते हे विद्यार्थ्यांना समजावे यासाठी जामखेड न्यायालयाची सफर घडवून आणणारी कालिका पोदार लर्न स्कूल ही जामखेड तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.