जामखेड टाइम्स वृत्तसेवा : इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर महात्म्यांनी बलिदान दिले आहे. युवापिढीने त्याची जाणीव ठेऊन आपला भारत देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करावा, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व आत्मनिर्भर व्हावे. कृषि शिक्षणाच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा, राष्ट्रीय कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घ्यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांनी दिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगावच्या प्रांगणामध्ये गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ८ वाजता ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. अनिल काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात काळे बोलत होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्यासाठी डीजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. यात फुले कृषि वाहिनी, फुले इरीगेशन शेड्यूलर, फुले कृषिदर्शनी, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान इत्यादींचा समावेश आहे. हरित क्रांतीनंतर देशातील शेतीसमोर खूप मोठी आव्हाने निर्माण झाली, यामध्ये पाण्याचा अयोग्य वापर, जमिनीची वाढती नापीकता, वाढती लोकसंख्या यांचा समावेश आहे, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, यावर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून जनुकीय परिवर्तीत पिके, जनुकीय संपादने तंत्रज्ञान मार्फत पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढवली पाहिजे असा सल्ला डॉ. अनिल काळे यांनी यावेळी बोलताना दिला.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महात्मा फुले कृषि विद्यापीठाने नव्याने विकसित केलेले तूर पिकाचे वाण फुले पल्लवी, वालाचे वाण फुले श्रावणी यांचे देशाला लोकार्पण झाले ही आपल्या विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे असे सांगत डॉ. अनिल काळे पुढे म्हणाले की,आतापर्यंत राहुरी विद्यापीठाने १८६६ शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केलेल्या आहेत. यावर्षी, विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल कमांडंट डॉ. प्रशांत कुमार पाटील यांचे नेतृत्वाखाली ८९ शिफारशी, ०६ वाण, ०५ यंत्रे प्रसारित केल्या आहेत व ते काम आपल्यासाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.
सांस्कृतिक कार्यक्रम सल्लागार डॉ. नजिर तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ७८ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थी मनोगत, देशभक्तीपर कविता, महिला स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषा, नृत्य, पथनाट्य, चित्रकला स्पर्धा इत्यादींचा समावेश होता. विद्यार्थ्यांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमादरम्यान, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. युवा पिढी व जनतेच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी या उद्धेशाने ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत १४ ऑगस्ट रोजी ‘तिरंगा यात्रेचे, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा गीत व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगा यात्रा महाविद्यालयातून हाळगाव गावठाण, बाजारपेठ या ठिकाणी काढण्यात आली होती.
सदर कार्यक्रमास विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनावणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, सांस्कृतिक कार्यक्रम सल्लागार डॉ. नजिर तांबोळी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट पवार, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनोज गुड, प्रा. अरुण पाळंदे, सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण डॉ. राहुल विधाते, डॉ. निलेश लांडे, डॉ. उत्कर्षा गवारे, नवनाथ शिंदे, डॉ. किरण चौधरी, डॉ. दिपक वाळूंजकर, शशी कांबळे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितित कार्यक्रम उत्साहात पार पडला.