Sugarcane crushing season 2023-2024 : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत – साखर आयुक्त कार्यालयाचे अवाहन
पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी अगामी ऊस गळीत हंगाम 2023 -2024 साठी ऊस गाळप परवाने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे अवाहन साखर आयुक्त कार्यालयाने केले आहे. याबाबत 28 जूलै 2023 रोजी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांना पत्र जारी करण्यात आले आहे.
अगामी गळीत हंगामाचे धोरण ठरवण्यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीची बैठक पार पडणार आहे. त्यात नवे धोरण निश्चित होणार आहे. मंत्री समितीच्या बैठकीत घेतलेले निर्णय राज्यातील सर्व साखर कारखान्यांना बंधनकारक असतात.
अगामी ऊस गळीत हंगामासाठी साखर आयुक्तालयाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना अगामी ऊस गळीत हंगाम 2023-2024 साठी ऊस गाळप परवाने देण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया साखर आयुक्त कार्यालयाने हाती घेतली आहे. 1ऑगस्ट 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत अर्ज सादर करणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाने दिले जाणार आहेत.
ऊस गाळप परवान्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसांच्या आत प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या स्तरावर सदर अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर साखर आयुक्त स्तरावर अर्जाची छाननी होईल. त्यानंतर साखर कारखान्यांना ऑनलाईन ऊस गाळप परवाने दिले जाणार आहेत.
राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप परवाने मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https:// crushinglic.mahasugar.co.in/login.aspx या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याचे अवाहन साखर आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.