संडे स्पेशल स्टोरी : पुस्तकातली झाडे थेट विद्यालयाच्या अंगणात,ल. ना होशिंग विद्यालयाने साकारले वनौषधी उद्यान, विद्यार्थी घेतायेत प्रात्यक्षिक शिक्षणाचा आनंद
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आजचा जमाना सोशल मिडीयाचा आहे. यामुळे प्रत्येक कुटूंबात मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. कोरोना महामारीमुळे आलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे तर शालेय विद्यार्थी ऑनलाईन दुनियेत अधिक सक्रीय झाले आहेत. अभासी जगातील म्हणा अथवा पुस्तकातील ज्या गोष्टींचं शिक्षण दिलं जातं, त्या गोष्टी प्रत्यक्ष पहायला, हाताळायला, अभ्यासायला मिळाल्या तर, ज्ञानात तर वाढ होणारच, पण त्या गोष्टीतून आकर्षण आणि प्रेरणा निर्माण होऊ शकते, हाच विचार अंमलात आणला जातोय तो आपल्या जामखेडमध्ये, त्याचीच ही गोष्ट !
जामखेड शहरातील दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या ल. ना होशिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुस्तकातील गोष्टी प्रत्यक्ष पाहता याव्यात यासाठी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या संकल्पनेतून विद्यालयाने पुस्तकातली झाडे विद्यालयाच्या अंगणात हा उपक्रम हाती घेतला आहे.
ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या संकल्पनेतून पुस्तकातली झाडे थेट विद्यालयाच्या अंगणात अवतरली आहेत. विद्यालयातील मुख्य मैदानाच्या कडेला दुर्मिळ वनौषधींचे उद्यान साकारण्यात आले आहे. शाळेतील प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांना या उद्यानात नेले जाते. या उद्यानात लावण्यात आलेल्या वनौषधींच्या प्रत्येक झाडाशेजारी त्या वृक्षाच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे.
वनौषधींचे नाव, त्याचे औषधी गुणधर्म आणि त्यांचा मानवी आजारांवर होणारा उपयोग अशी माहितीही या उद्यानात विद्यार्थ्यांना अभ्यासायला मिळत आहे. या उद्यानाच्या देखभालीतून शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे धडे गिरविण्याचीही संधी मिळत आहे. विद्यालयाने उभारलेल्या वनौषधी उद्यानाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. न पाहिलेल्या दुर्मिळ वनौषधींना प्रत्यक्ष पाहून विद्यार्थ्यी हरकुन जात आहेत.वनौषधी उद्यानामुळे विद्यालयाच्या सौंदर्यात दुर्मिळ वनस्पतींची भर पडली आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्राचार्य श्रीकांत होशिंग हे ओळखले जातात. त्यांच्या पुढाकारातून विद्यालयात अनेक उपक्रम सुरु आहेत. एक झाड व एक कुंडी हाही उपक्रम विद्यालयात राबवला जात आहे. या उपक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यांनी वाढदिवसानिमित्त विद्यालयाला आजवर १०० कुंड्या भेट दिल्या आहेत.
दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून तसेच उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, उपप्राचार्य पोपटराव जरे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, प्रा एस.ए. शेख, प्रा एस एस पवार, प्रा साळुंके सर, राठोड बी के, बाळासाहेब मंडलिक,हनुमंत वराट यांच्या सहकार्यातून आणि अथक परिश्रमातून प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी हाती घेतलेला पुस्तकातील झाडे विद्यालयाच्या अंगणात हा प्रकल्प यशस्वी होताना दिसत आहे.
उद्यानात 37 प्रकारच्या दुर्मिळ वनौषधी
ल. ना होशिंग विद्यालयात उभारण्यात आलेल्या वनौषधी उद्यानात सायकस, करमळ, अडुळसा, पिवळा पळस, मुचकुंद, लक्ष्मणफळ, पिचकारी, शेंदरी, कैलासपती, बहावा, पिपळी, धावडा, नेवार, शतावरी, पांढरी सावर,पारिजातक, रिठा, शिकेकाई, शेंदरी, लाचाळू,हिरडा, बेहडा, अर्जुन, गवती चहा, कोरफड,वड,पिंपळ, सीता अशोक, शिसव, टॅब्युबिया, नेवार, बेल, कोरफड, फणस तसेच मधुमालती गोकर्ण, जाई अश्या 37 प्रकारच्या दुर्मिळ वनौषधी लावण्यात आले आहेत.
अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या वनौषधींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी,त्या वनस्पती प्रत्यक्ष पाहाता याव्यात, निसर्गाविषयी, औषधी वनस्पतींची आवड निर्माण व्हावी तसेच दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन व्हावे या प्रामाणिक उद्देशाने विद्यालयात वनौषधी उद्यानाची निर्मिती केली. सर्व विद्यार्थी याचा आनंद घेत आहेत. सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी होत आहे. – श्रीकांत होशिंग, मुख्याध्यापक, ल.ना. होशिंग विद्यालय, जामखेड
अभ्यासक्रमामध्ये विविध औषधी वनस्पतीसंदर्भात माहिती असते, त्या वनस्पती विद्यार्थ्यांनी समक्ष पाहिल्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी वाढ होऊ शकते. तसेच वनौषधींच्या वापरासंदर्भात जागृती निर्माण होऊ शकते म्हणून पुस्तकातील झाडे विद्यालयाच्या अंगणात हा विद्यालयाने हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे – शशिकांत देशमुख, सचिव दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी, जामखेड