Swati Suryavanshi news : बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधींचा अपहार, महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, महसूल विभागात उडाली खळबळ

Swati Suryavanshi news : महसुल विभागात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. शासकीय प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहण प्रक्रिया राबवण्यासाठी नियुक्तीस असलेल्या एका उपजिल्हाधिकाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधींच्या निधीवरच डल्ला मारल्याचे प्रकरण वर्धा जिल्ह्यातून उघडकीस आले आहे. कोट्यावधींच्या अपहार प्रकरणी महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वाती सूर्यवंशी (Swati Suryavanshi) असे या महिला उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे.

Swati Suryavanshi news, Misappropriation of crores on the basis of fake documents, case registered against female deputy district officer, excitement in  revenue department, vardha, parbhani,

शासकीय प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या जात असतो. त्याची जबाबदारी संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांची असते. त्या पदावर वर्धा येथे कार्यरत असणाऱ्या तत्कालीन उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी ह्या सध्या परभणी येथे नियुक्तीस आहेत. वर्धा येथे लघु सिंचन कालवे प्रकल्पाच्या उपजिल्हाधिकारी म्हणून स्वाती सूर्यवंशी ह्या १७ फेब्रुवारी २०२२ ते १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत कार्यरत होत्या.त्याच काळात त्यांनी शासकीय निधीवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे.

जमिनी अधिग्रहण प्रकियेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधी रूपयांचा अपहार केल्याची माहिती वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना (Collector Rahul Kardile) मिळाली असता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यालयातील कागदपत्रे सील करत चौकशी समिती स्थापन केली. सदर अपहार प्रकरणाच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. या चौकशीत समुद्रपूर तालुक्यातील २५ वर्षांपूर्वी वाटप झालेल्या १६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रकरण पुढे आले. त्यांच्या नावे २ कोटी १३ लाख ३११ रुपये बनावट कागदपत्रे सादर करीत काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तर कोषागार कार्यालयातील शासकीय खात्यातून ५ लोकांच्या नावे ५० लाख ८५ हजार ४२४ रुपये दोन पतसंस्थेत खोटे खाते उघडून वळते केल्याचे दिसून आले.

चौकशीत अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.२५ वर्षांपूर्वी निवड झालेल्या शेतकऱ्यांचे नाव निवाड्यात नव्हते. मोबदला मिळावा म्हणून ज्यांनी अर्ज सुद्धा सादर केला नाही, अश्याही लोकांच्या नावाने पैसे उकलण्यात आले. या प्रकरणात शेतकरी महिला नागरी सहकारी पतसंस्था व हिंगणघाट येथील आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्याशी सूर्यवंशी यांनी सांगनमत करीत बनावट कागदपत्रे देत खोटे खाते काढले. त्यात पैसे जमा करीत नंतर ते काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

हे प्रकरण महसूल खात्यात चांगलेच खळबळ उडविणारे ठरत आहे. उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर पूर्वी काही प्रकरणात पण कारवाई झाली असल्याची बाब आता पुढे आली आहे. हा मोठा भ्रष्टाचार असल्याचे सिद्ध झाल्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पोलीस तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी विविध कलमन्वये गुन्हे दाखल केले आहे. पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.