जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांच्या निकालाच्या आदल्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये EVM मशीन पकडण्यात आल्या. यावरून देशाच्या राजकारणात उलट सुलट चर्चा रंगली आहे. EVM वर बंदी आणावी ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. अश्यातच महाराष्ट्रात अगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.
देशात कुठेही निवडणूका झाल्या कि, EVM वर बंदी आणावी, अशी पहिली मागणी सातत्याने होत असते. EVM वरील निवडणूका पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप सातत्याने होत आला आहे. देशात उत्तर प्रदेश सह राज्यांच्या विधानसभा निकालानंतर ही मागणी जोर पकडू लागली आहे. मात्र महाराष्ट्रात अगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
यासंदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे, त्यात म्हटले आहे की, अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ह्या बॅलेट पेपरवर (ballot paper) घेतल्या, तो राज्याचा निर्णय असतो, महाराष्ट्राने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर (Ballot Paper) घ्यावी अशी मागणी अव्हाड यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हाड यांनी ट्विट टॅग केले आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी EVM वर बंदी आणून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकारने देशातील इतर राज्यांप्रमाणे निर्णय घेण्याची मागणी केल्याने महाविकास आघाडी सरकार आता या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.