जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महसुल विभागाकडून तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. 4644 तलाठी (गट क) पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तलाठी भरतीसाठी 26 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तलाठी भरतीची ऑनलाईन लिंक कधी उपलब्ध होणार याची सर्वच उमेदवारांना उत्सुकता आहे. मात्र आता लिंकबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
तलाठी भरती 2023 ची भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडे आहे. या कार्यालयाच्या माध्यमांतून राज्यातील 36 जिल्ह्यातील परिक्षा केंद्रांवर ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले जाणार आहेत. त्यासाठीची लिंक बनवण्याची प्रकिया सुरु आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तयार करण्यात आली असून त्यात काही किरकोळ बदल करायचे आहेत, त्यानंतर ही लिंक येत्या दोन दिवसांत खुली केली जाणार आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्तालयातील सुत्रांनी दिली आहे.
तलाठी भरतीचे अर्ज लिंकद्वारे स्विकारण्यापुर्वी लिंक खुली करण्यासंदर्भात जमाबंदी आयुक्तालयाकडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे. तलाठी भरती 2023 मध्ये एकुण 4644 पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी येत्या 26 जून 2023 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जुलै 2023 रोजी 23: 55 वाजेपर्यंत आहे, अशी माहिती तलाठी जाहिरातीत नमुद आहे.
महसुल विभागात 4 हजार 644 तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तलाठी पदभरती राबविण्यासाठी महसूल व वन विभागाने राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नेमणूक केली आहे. (State Upper Jamabandi Commissioner and Additional Director Land Records Anand Raite)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 644 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) कार्यालयाकडून राज्यातील एकूण 36 जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन (कंप्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीच्या अंमलबजावणीसाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला, पुणे या ठिकाणी ‘तलाठी भरती कक्ष’ सुरु केला आहे.
तलाठी भरती कक्षामध्ये पद भरती प्रक्रिया राबविण्याकरीता सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयामधील तरतूदी व मार्गदर्शक सूचनांनुसार नमूद कंपन्यांची व्यवहार्यता तपासून कंपनीची निवड करणे, एजन्सीने निवडलेले परीक्षा केंद्र क्षेत्रीय यंत्रणेमार्फत तपासणे, पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करुन निवड केलेल्या कंपनीसोबत पदभरती प्रक्रियेसंबंधित सामंजस्य करार करणे, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे आयोजन, परीक्षेचा निकाल, शिफारस झालेल्या व शिफारस न झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, पदभरतीसंबंधीत उमेदवारांकडून आक्षेप व तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यासंबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करुन अडचणींचे निराकरण करणे आदी प्रकारची कामे होणार आहे.
सदर तलाठी भरतीसाठी सामान्य नागरिकांसाठी व प्रक्रियेमध्ये सहभागी होणार्या उमेदवारांसाठी सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे राज्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख आनंद रायते (Anand Raite) यांनी कळविले आहे.