जामखेड टाइम्स वृत्तसेवा । तुळजापूरहून देवीचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये पाच जण ठार झाले आहेत तर दहा जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. अपघातातील मृत भाविक उदगीरला परतत होते.उदगीर नळेगाव रस्त्यावरील हैबतपुर पाटीच्या पुढे ही दुर्दैवी घटना घडली.
आज सकाळी उदगीरहून चाकुुरकडे जाणारी बस आणि तुळजापूरहून उदगीरच्या दिशेने जाणारी कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले. हे सर्वजण एका खाजगी रुग्णालयात कामास होते. तुळजापूरहून देवीचे दर्शन घेऊन घरी परतत असतानाच त्यांना काळाने गाठले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरशा: चक्काचूर झाला. बसमधील जखमींवर उदगीरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उदगीर आगाराची बस क्रमांक एमएच २० बीटी १३७५ मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता आगारातून चाकूरकडे रवाना झाली होती. ही बस हैबतपुर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूर येथून दर्शन घेऊन उदगीरकडे येणारी कार क्रमांक एमएच २४ एबी ०४०८ बसला समोरुन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील पाचजण जागेवरच ठार झाले. तर बसमधील दहा जण जखमी झाले असून, त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले.
एसटी बस ही उदगीरहून चाकूरकडे निघालेली होती. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर कारमधील भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी चक्क गाडीता पत्रा कापावा लागला. गॅस कटरच्या साहाय्याने गाडीचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. कार चालकाने नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पाच तरुणांच्या मृत्यूने उदगीर शहरावर शोककळा पसरली आहे. तसंच मृतांच्या कुटुंबीयांवरही मोठा आघात झालाय.प्रियंका बनसोडे (वय-22) ही तरुणी या अपघातातून बचावली तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अपघातातील मृतांची नावे
- अलोक खेडकर (वय-21) रा. उदगीर
- अमोल देवक्तते (वय-24) रा. रावणकोळ ता. मुखेड जि. नांदेड
- कोमल कोद्रे (वय-22) रा. दोरनाळ ता. मुखेड जि. नांदेड
- यशोमती देशमुख (वय-28) रा. यवतमाळ
- नागेश गुंडेवार (वय-27) रा. उदगीर