Top News Of The Day : ५ ऑक्टोबर २०२४ : महाराष्ट्रात आज दिवसभरात काही महत्वाच्या घडामोडी घडल्या, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौर्यावर होते, विधानसभा निवडणुकीपुर्वी महाराष्ट्रात पक्षांतराची लाट सक्रीय झाली आहे, आमदार प्रा.राम शिंदे यांची जनसंवाद पदयात्रा, 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (Savitribai Fule scholarship scheme) अंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेत तब्बल तिप्पटीने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय, यासह जाणून घेऊयात अन्य महत्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौर्यावर होते. त्यांनी वाशिम जिल्ह्यातील भेट मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी बंजारा समाजाशी संवाद साधला. तत्पूर्वी बंजारा विरासत संग्रहालयाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यातील ९.५ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या निधीचे वितरण करण्यात आले.
२३ हजार कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. कृषी पायाभूत सुविधेंतर्गत ७५०० हून अधिक प्रकल्प समर्पित करण्यात आले. पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. राज्यातील १९ मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य जनतेसाठी राबवत असलेल्या विविध योजनांवर त्यांनी भाष्य केले.
कोल्हापुरात राहूल गांधींची टेम्पोचालकाच्या घरी भेट
एकिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौर्यावर असतानाच देशाचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हेही आज महाराष्ट्र दौर्यावर होते. कोल्हापूरमधील कसबा बावड्यात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला दाखल होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी उचगाव येथील टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या कुटूंबाशी एक तास संवाद साधला. तिथेच त्यांनी स्वता: जेवण बनवले. संधे कुटूंबासोबत ते जेवले. त्यानंतर राहूल गांधी मुख्य कार्यक्रमाला रवाना झाले.
Top News Of The Day : आमदार प्रा.राम शिंदे यांच्या जनसंवाद यात्रेला कर्जत जामखेड मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद
भाजपा नेते माजी मंत्री आमदार प्रा.राम शिंदे यांच्या जनसंवाद यात्रेला कर्जत जामखेड मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांची जनसंवाद पदयात्रा मतदारसंघात सुरू आहे. या पदयात्रेत सर्वसामान्य नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहेत.
विद्यमान आमदार रोहित पवारांविरोधात जोरदार लाट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये सध्या भूमिपुत्रच आमदार हवा हा नारा दिला जात आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांची लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. शिंदे हे सर्वसामान्य जनतेत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. शिंदे यांचे गावागावात जल्लोषात स्वागत होत आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या जनसंवाद पदयात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
महाराष्ट्रातील विकासाच्या या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्राला महायुती सारख्या चांगल्या सरकारची गरज आहे.स्वच्छ सरकारची गरज आहे.आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. आपल्याला देशाला खूप पुढे न्यायचं आहे. राज्यातील नागरिक एनडीएच्या सोबत आहे. आपण सोबत मिळून महाराष्ट्राचं स्वप्न साकार करु”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
ज्यांनी अहदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचं काम पुढे सरकू दिलं नाही.त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील पाण्याशी संबंधित प्रकल्पही बंद पाडलं.लोकांची तहान भागवण्यासाठी सुरू झालेले प्रकल्प त्यांनी थांबवले. तुमची प्रत्येक कामे विरोधक रोखत होते. आता त्यांना रोखा. महाराष्ट्रातील विकासाच्या या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा. शेकडो मैल दूर ठेवा”, असे अवाहन नरेंद्र मोदी यांनी ठाण्यात बोलताना केले.
महाराष्ट्रात पक्षांतराची लाट
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पक्षांतराची लाट महाराष्ट्रात आली आहे.महायुती व महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काही नेत्यांचे तिकीट मिळवून आमदार होण्याचे स्वप्न भंगणार आहे. यामुळे अनेक नेते पक्षांतर करत आहेत. एकाच पक्षात अनेक इच्छुक आहेत. तेही स्थानिक समीकरणे नजरेसमोर ठेवून पक्षांतर करत आहेत.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हेही पक्षांतराच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी पक्षाला रामराम ठोकलाय, ते काँग्रेसच्या वाटेवर आहे. राजेंद्र गावित हे मंत्री विजय गावित यांचे बंधू आहेत.
5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींच्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ
मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (Savitribai Fule scholarship scheme) अंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेत तब्बल तिप्पटीने वाढ करण्यात आली आहे.
इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकण घेणाऱ्या फक्त मुलींना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात 60 रुपये वरुन 250 प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे. तर विभाभज , विमाप्र व इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक स्वरुपात दिली जाणारी 100 रुपयांची रक्कम ही 300 रुपये प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे.