जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एकिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमधील वाद पेटलेला असतानाच आता उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे हे ईडीच्या कचाट्यात सापडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या संपत्तीची ईडी किंवा सीबीआय मार्फत चौकशी करावी या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे ही याचिका बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या कुटुंबाकडून दाखल करण्यात आली आहे. या मागणीमुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या गौरी भिडे आणि अभय भिडे यांनी उध्दव ठाकरे कुटूंबाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. भिडे परिवाराने आणीबाणीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या साप्ताहिकाची छपाई केली आहे.गौरी सांगतात की, त्या ना खाऊंगा ना खाने दुंगा या तत्वाने प्रेरित आहेत. या दोघांनी दाखल केलेली ही याचिका संजय गंगापूरवाला आणि आरएम लड्ढा या न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आहे. भिडे दादरचे रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे शिवसैनिकांशी चांगले संबंध आहे.
भिडेंच्या या याचिकेमधून महाराष्ट्र सरकारच्या सिडकोच्या मालकीचे जमिनीचे तुकडे जे सामनाचे मालक आणि प्रकाशक असलेल्या प्रबोधन प्रकाशनाकडे आहेत, त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात आलं आहे. या ट्रस्टची भागिदारी कालांतराने बदलली आणि आता या ट्रस्टची मालकी पूर्णपणे ठाकरेंकडे गेली आहे, असंही या याचिकेत म्हटलं आहे. कोविड काळात लागलेल्या लॉकडाऊनमध्ये ठाकरेंच्या या प्रबोधन प्रकाशनाने ४२ कोटींचा टर्नओव्हर केल्याचं दाखवलं आहे, तसंच यातून ११.५ कोटी फायदा मिळाल्याचंही दाखवलं आहे. त्यामुळे हा सगळा काळा पैसा असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
उध्दव ठाकरे यांच्या कुटूंबाविरोधात भिडे परिवाराने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत ठाकरे कुटुंबाची ईडी किंवा सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. कोर्ट यावर काय निर्णय देणार हे पहावं लागणार आहे. दरम्यान भिडे परिवाराच्या मागणीवरून उध्दव ठाकरे यांना जोर का झटका बसू शकतो अशी चर्चा सुरु झाली आहे. ईडीकडून ठाकरे कुटुंबाची चौकशी होणार का ? याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.