राज्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा,अनेक भागात गारपीट, भोकरदनमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू, शेतातील पिके उद्ध्वस्त, करोडोंचे नुकसान !
Avakali Paus News : सोमवारी सायंकाळी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यातील अनेक जिल्ह्यात गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठी दाणादाण उडवून दिली. रब्बी पिकांचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे.
भोकरदन तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपिट झाली. कुंभारी गावातील विवाहिता पल्लवी विशाल दाभाडे (वय २१) या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. महिला घराजवळील शेतातून घरी जात असताना ही घटना घडली. अंगावर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाल्याने तिच्या दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून मातृक्षत्र हरपले आहे. दुसऱ्या घटनेत सिपोरा बाजार येथील शिवाजी गणपत कड (वय ३८ ) यांचा शेतात काम करत असतानाच अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
भोकरदन, पारध, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, पद्मावती, सावंगी, दानापूर, वालसावंगी, आदी परिसरत वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता.
खामगाव (बुलढाणा) : घाटाखालील नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील काही गावांमध्ये सोमवारी सायंकाळनंतर ते रात्री उशिरापर्यंत वादळीवाऱ््यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला.त्यामध्ये नांदुरा तालुक्यातील डिघी, येरळी, दादगाव, कोदरखेड तर जळगाव जामोद तालुक्यात हिंगणा मानकर, सुनगाव. संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा, वरवट बकाल, वडगाव वान यासह अनेक गावांमध्ये संत्र्यासह गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
संग्रामपूर : सोमवारी रात्री संग्रामपूर तालूक्यातील विविध पिकांना वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा बसला. त्यामुळे संत्र्यासह गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने अगोदरच आर्थिक डबघाईस आलेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यात असंख्य गावांमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित झाला.
सोमवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हाहाकार माजविल्याने रब्बी पिकांसह फळ पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. संग्रामपूर तालूक्यात गहू, ५१३ हेक्टर, हरभरा १५ हजार ९३२ हेक्टर, रब्बी ज्वारी ३७२ हेक्टर, मका ५२२ हेक्टर, कांदा १ हजार ३१७ हेक्टर, भाजीपाला ३५ हेक्टर तर इतर रब्बी पिके १९ हेक्टर असे एकूण १८ हजार ७१० हेक्टरवर रब्बी पिके बहरलेली आहेत. तसेच फळ पिकांमध्ये संत्रा ३ हजार ३२९ हेक्टर, आंबा ६.२ हेक्टर, सीताफळ ३८ हेक्टर, लिंबू २१० हेक्टर, डाळींब १६.२ हेक्टर, पपई १५ हेक्टर, केळी ४५० असे एकूण ४ हजार ६४ हेक्टर जमिनीवर फळ पिके बहरलेली आहेत. यामध्ये सर्वाधिक संत्र्याच्या बागा असून संत्र्याचा मृगबहार तोडणीला आला आहे. दरम्यान सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच गार पडल्याने सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील अनेक भागात गारपीट आणि वादळी पावसाने यंदाच्याही रब्बी हंगामातील पिके उध्वस्त केली. आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट झाल्यानं अभी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आणि इतर पिक आडवी झाली आहेत.
सध्या गहू, ज्वारी आणि हरभरा ही मुख्य रब्बी पिके परिपक्व झाली आहेत, तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहेत, त्याचवेळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. मागच्या वर्षी अशाच पद्धतीने काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालं होतं. आता यंदाही आणखी काही दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तेल्हारा आणि अकोट तालुक्यातल्या काही भागात अवकाळी पावसानं चांगलच झोडपलये. तर तेल्हारा तालुक्यात पावसानं मोठी हजेरी लावली आहे. आज रात्री 8 वाजेपासून जिल्ह्यातील तीन तालुक्यात अवकाळी पावसान हजेरी लावली आहे. याशिवाय अकोला तालुक्यातील केळीवेळी आणि दहिहंडा, कुटासा या ग्रामीण भागातही पाऊस सुरू आहे. सध्या हरभरा सोंगणीला आलाय. जेमतेम सोंगणीला सुरवात होणार तोच विजांच्या कडकडाटासह अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळ पुन्हा एकदा शेतकरऱ्यांसमोर आस्मानी संकटात ठाकले आहे.
भोकरदन तालुक्यासह जाफराबाद तालुक्यात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आणि मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने हरबरा, गव्हाच्या पिकासह शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वारासह गारांचा पाऊस झाल्याने ऐन काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका, कांदा, ज्वारी, भाजरी यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर आज दुपारनंतर काही भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. नांदुरा,जळगाव जामोद आणि मलकापूर , संग्रामपूर तालुक्यातील काही परिसरात गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पीक असलेल्या गहू, हरबरा, कांदा, भाजीपाला आणि फळबागांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात सोमवारी रात्री नऊ च्यी सुमारास विजेचा कडकडाट,ढगांचा गडगडाट अन सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.जळगाव शहरात विजेच्या कडकडासह पावसाच्या सरी कोसळल्या. हवामानात बदल होत असतानाच पुढील 3 ते 4 दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 48 तासांत अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही जिल्ह्यांत, खान्देश या भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे.