Varandha Ghat Accident : 500 फुट खोल दरीत कार कोसळली, भोरच्या वरंधा घाटातील भीषण अपघातात एक ठार तर आठ जण गंभीर जखमी
Varandha Ghat Accident Today : भोर – महाड मार्गावरील वरंधा घाटातून भीषण अपघाताची एक बातमी समोर आली आहे. पुण्याजवळील वरंधा घाटात इको कार ५०० खोल फुट दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर जवळच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यातील भोर – महाड मार्गावरील वरंधा घाटात पहाटे भीषण अपघात झालाय. ९ जणांना घेऊन जाणारी इको कार (MH 12 UJ 9957) ५०० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक जणाचा मृत्यू झालाय, तर ८ जण जखमी आहेत. जखणींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, इको कार महाडहून भोरच्या दिशेने येत होती. त्यावेळी पहाटे चार वाजता वरंधा घाटातील उंबरडे गावच्या हद्दीत कार अचानक ५०० फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
वरंधा घाटातील अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याशिवाय बचाव पथकही तात्काळ पोहचलं. स्थानिक शिरगाव रेस्क्यू पथकाच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढलं. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.
शुभम शिर्के असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश गुजर वय 26, आशिष गायकवाड वय 29, सिद्धार्थ गंधणे वय 26, सौरभ महादे वय 22, गणेश लवंडे वय 27, अमोल रेकीणरं वय 27, यशराज चंद्र वय 22, आकाश आडकर वय 25 हे ८ जण जखमी झाले आहेत. हे सर्व तरूण पुण्यातील रहिवासी आहेत.
भोर पोलिसांनी (Bhor Police) घटनास्थळी पोहचून स्थानिक व सह्याद्री बचाव टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढले असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, भोर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राहुल मखरे, सुनील चव्हाण, सागर झेंडे, वारवंडचे पोलिस पाटील सुधीर दिघे, स्थानिक ग्रामस्थ भाऊ उंब्राटकर, विठ्ठल पोळ, नीलेश उंब्राटकर,अक्षय धुमाळ, नीलेश पोळ यांनी घटनास्थळी पोहचून मदत केली. पुढील तपास भोर पोलिस करीत आहेत.