जामखेड टाईम्स वृत्तसेवा । देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या अॅड. सतीश उके यांंच्यासह त्यांचे बंधु प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. (ED raided lawyer Satish Uke House, who had filed petition against Devendra Fadnavis)
आज सकाळपासून उके यांच्या घराची ईडीकडून झाडाझडती सुरू होती. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या व्यावहारासंबंधी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. मात्र ही कारवाई राजकीय सुडबुध्दीतून झाल्याची चर्चा राज्यात रंगली आहे.
ॲड. सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाड टाकली होती. अॅड सतीश उके यांच्या नागपुरातीलघरी गुरुवारी सकाळी ईडीचे पथक पोहोचले आणि झाडाझडती सुरू केली. ईडीचे पाच ते सहा अधिकारी येथे पोहोचले आणि तब्बल सहा तास छापेमारी सुरू होती.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आला होता आणि या प्रकरणी नागपूरमधील वकील ॲड सतीश उके यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
“तसेच नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात जी निवडणूक याचिका दाखल केली होती त्यातही सतीश उके यांचा पुढाकार होता. नाना पटोले यांचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिले.”
काय आहे प्रकरण?
फडणवीस नागपूरचे महापौर असताना त्यांनी एका जमिनीच्या प्रकरणात काही निर्णय घेतले होते. त्यासंदर्भातच त्यांच्या विरोधात दोन खटले दाखल झाले होते. त्या प्रकरणांत फडणवीस यांना जामीन मिळवला होता. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही प्रकरणांचा उल्लेख केला नाही.
2019 मध्ये दाखल झाली याचिका
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती. नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जीवनलाल जबलपुरे यांनी वकील सतीश उके यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली होती.