मुसळधार पावसाचा हाहाकार : ST बस गेली पुरात वाहून, बचाव कार्य वेगाने सुरू : पहा VIDEO 

केबिनमध्ये तीन प्रवासी मृतावस्थेत

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । मुसळधार पावसात एसटी बस (ST Bus) थेट नदीच्या पाण्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटीच्या हिरकणी बसला हा अपघात झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal district) उमरखेड (Umerkhed) शहरापासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Live Video of ST bus fall into river in Yavatmal)

नदीवरुन पाणी वाहत असताना एसटी बस चालकाने नको ते धाडस करत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. या पुलावरुन पाणी वाहत असतानाही चालकाने त्या पाण्यातून गाडी नेली आणि पाण्याच्या प्रवाहात ही बस वाहून गेली.या अपघाताचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओत एसटी बस थेट पाण्यात वाहून जात असताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत बसमधील प्रवासी आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत. बसच्या टपावर अडकलेले प्रवासी मदतीसाठी हाक देत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या एसटी बसमध्ये 20 ते 22 जण होते. घटनास्थळी मोठ्या वेगाने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे. तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

मात्र, अद्याप एसटी चालक आणि एसटी वाहक यांची माहिती मिळू शकलेली नाहीये. गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. नद्या ओसंडून वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत.

 

नांदेडवरून नागपूरकडे येताना उमरखेड समोरील पुलावरून वाहून गेलेल्या बसमध्ये नांदेडवरून बसलेल्या आठ प्रवाशांची नोंद एसटी महामंडळाच्या जीपीएस प्रणाली वरून झाली आहे.या बसमध्ये उमरखेड वरून पुन्हा किती प्रवासी बसले याची मात्र नोंद नाही. यामुळे बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, यासंदर्भात अद्याप निश्चित माहिती नाही.

नागपूरचे विभाग नियंत्रक नरेंद्र बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस घाटरोड डेपोची असून वाहन चालक सतीश रंगप्पा सूरेवार (53) आणि कंडक्टर भिमराव लक्ष्मण नागरीकर (56) हे सेवेत होते. काल रात्री 10 वाजता प्रवासी घेऊन हे दोघेही नांदेडला निघाले होते. यानंतर, मंगळवारी सकाळी 05:18 वाजता ही बस नांदेडवरून निघाली. तिकीट मशीनला जोडलेल्या जीपीएस प्रणाली नुसार या बसमध्ये आठ प्रवासी होते. त्यातील 4 हदगाव व 4 प्रवासी दिग्रसला उतरणारे होते. उमरखेडवरून ही बस 7.30 वाजता दिग्रसमार्गे नागपूरकडे निघाली. हे घटनास्थळ उमरखेड पासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असल्याने किती प्रवाशांचे बुकिंग झाले हे मात्र कळू शकलेले नाही.

एसटी चालक सतीश सूरेवार यांना एसटी महामंडळामध्ये 24 वर्षांच्या सेवेचा अनुभव आहे. 1997 मध्ये ते महामंडळात रुजू झाले होते. त्यांच्या हाताने एकही अपघात घडल्याची नोंद नाही. मागील 15 वर्षापासून नागपूर- नांदेड या मार्गावरील सेवेचा त्यांना अनुभव होता. काल रात्री याच मार्गावरून बस नेताना त्यांना नाल्याला फारसा पूर दिसला नसावा. यामुळे परत येताना ओव्हर कॉन्फिडन्समुळे त्यांनी ही बस पुलावरून टाकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य केले. तीन जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर केबिनमध्ये पुन्हा 3 जण मृतावस्थेत दिसत असल्याची माहिती आहे. बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.