जामखेड टाईम्स वृत्तसेवा । स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वाभिमान पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्याविरोधात पक्षाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार भुयार यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या कारवाईमुळे स्वाभिमानीचा राज्यात एकही आमदार नसणार आहे. (Raju Shetty’s big decision, expulsion of MLA Devendra Bhuyar from the party)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरावतीच्या हिवरखेड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर कारवाईची घोषणा केली. भुयार यांची संघटनेसह पक्षातून हकालपट्टीची घोषणा शेट्टी यांनी केली. तसेच निलंबनही करण्यात आलं. भुयार हे पक्षात सक्रीय नसल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान भुयार हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सातत्याने बोलले जात होते. आता त्यांची स्वाभिमान पक्षाने हकालपट्टी केल्याने ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भुयार यांच्याविरोधात यापुढे स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक होणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान राजू शेट्टी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यादृष्टीनेच स्वाभिमानीचे पाऊले पडत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा न करता आपल्या पक्षाच्या आमदाराचीच पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतल्याने स्वाभिमानी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यात जमा आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चिली जाऊ लागली आहे.
दरम्यान स्वाभिमानीतून हकालपट्टीची घोषणा झाल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांनी यासंबंधी एका शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. भुयार यांनी फेसबुकवर धन्यवाद हा एक शब्द लिहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याविरोधात कारवाई होणार हे भुयार यांना आधीच अंदाज आला असेल त्यामुळेच भुयार यांनी एका शब्दांत या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली अशी चर्चा आहे.