Vidhan Sabha Nivadnuk 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चा, निदर्शनांना बंदी – जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत. वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.