लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्वर्गवासाला पाहता पाहता दहा वर्षे लोटली.पण आजही महाराष्ट्राला त्यांची पदोपदी आठवण येते.गटबाजी, मतभेद आणि डावपेच हा राजकारणाचा स्थायीभाव आहे.त्याला स्वर्गीय विलासराव अपवाद नव्हतेच, परंतु,त्या स्थायीभावाला निर्णायक न्याय देताना मूलभूत नितीमूल्य आणि सामाजिक संकेतांचा अंगिकार करायचे.त्याच कारणाने ते सदैव सर्वांच्याच विश्वास आणि प्रेमाचे धनी ठरले.
सर्वसामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारा मुख्यमंत्री अशी त्यांची ख्याती राहिली.मी कोल्हापूरला असताना माझ्या अनेक सहकाऱ्यांनी तसा अनुभव घेतला. मी सहजच साहेबांना फोन लावायचो आणि तेही लगेचच फोन घ्यायचे अथवा काही वेळानंतर कॉलबॅक करायचे! हे पाहून माझे सहकारी आश्चर्यचकित व्हायचे.असाच अनुभव राज्यातील अनेकांना आलेला आहे.
गटबाजी फोडाफोडी आणि सत्ता संघर्ष ते मुख्यमंत्री असतानाही होताच. त्यातून घडलेल्या अनेक घटना घडामोडींचा उभा महाराष्ट्र साक्षीदार आहे. त्या घटना घडामोडींना ते मोठ्या हिमतीने आणि कौशल्याने सामोरे गेले. आपल्या प्रतिमेला आणि सुसंस्कृतपणाला धक्का लागणार नाही याची काळजी त्यांनी वाहिली.
मला आठवते, लोकनेते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या चरित्रावरील पुस्तकाचे माझे लेखन सुरु होते. खरे तर, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांचे राजकीय मानसपुत्र म्हणून विलासरावजींना महाराष्ट्र ओळखत आल्याचे इतिहास सांगतो. पण राज्याच्या राजकारणातील शंकररावजींचे कट्टर विरोधक म्हणून स्वर्गीय वसंतदादांची आवर्जून नोंद झाली आहे. तरीही राजकारणात सुरुवातीच्या काळात विलासरावजींच्या गुणांचे सोने केले ते वसंतदादा पाटील यांनीच.
अगदी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील मोठ्या कौतुकाने दादांनी विलासरावजींना दिले होते. माझ्या पुस्तकाच्या अनुषंगाने त्यांची मुलाखत मी घेतली तेव्हा ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. भेटीसाठी त्यांनी मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी मला वेळ दिली होती. मी विलासरावजींचे औरंगाबाद येथील निष्ठावंत कार्यकर्ते व स्वर्गीय दगडोजीराव देशमुख शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा विजय राऊत, विवेक जयस्वाल, विवेक पंढारकर आणि विवेक कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तब्बल दीड तास साहेब दादांबद्दल भरभरुन बोलत राहिले.
काही क्षणांना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचा अनुभव आम्ही घेतला. राज्याच्या राजकारणात शंकररावजींचे मानसपुत्र म्हणून वावरणाऱ्या साहेबांना दादांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला कुठलीही राजकीय भिंत आडवी येऊ शकली नाही. स्वर्गीय गोपीनाथरावजींशी मैत्री असो वा “दो हंसो का जोडा” म्हणून संबोधला गेलेला सुशीलकुमारजीं सोबतचा दोस्ताना असो, त्यांना कधीही अवघडल्यासारखे झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले नाही.
किंबहुना १९९५ साली लातूर विधानसभा मतदार संघात त्यांचा ऐतिहासिक पराभव करणाऱ्या शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनाही मुख्यमंत्री झाल्या नंतरच्या काळात विश्वास आणि प्रेमाने जवळ करण्याची खिलाडूवृत्ती त्यांनी दाखविली. राजकारणाला सुसंस्कृतपणा आणि माणुसकीची जोड देण्याचे काम त्यांनी केले. म्हणूनच आजच्या गढूळ राजकीय वातावरणात विलासरावजींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
लेखक – राजा माने (जेष्ठ संपादक)