Vinod Kambali Health : भारताचा महान डावखुरा फलंदाज विनोद कांबळी पुन्हा रूग्णालयात दाखल, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Vinod Kambali Health : भारताचा महान डावखुरा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला ठाण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे.सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. उपचारादरम्यान कांबळी यांच्या सर्व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या असून डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवले आहे. याबाबतची माहिती कांबळी याच्या एका चाहत्यांना सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.
काही दिवसांपुर्वी विनोद कांबळी हा दिवगंत रमाकांत आचरेकर सरांच्या स्मृतीचिन्हाच्या अनावरण सोहळ्यात दिसला होता. त्या कार्यक्रमात त्याची अवस्था पाहून सर्वांनाच दुःख झाले होते. त्याला नीट बोलताही येत नव्हते. क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्याला शनिवारी रात्री उशिरा ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असली तरी गंभीर आहे, सध्या तो तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. (Vinod Kambali Health)
विनोद कांबळीने काही दिवसांपूर्वी विकी लालवानीच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना तो म्हणाला होता की, ‘मला लघवीशी संबंधित समस्या येत होत्या. मी चक्कर येऊन पडलो होतो. माझा मुलगा येशूने मला उचलले आणि माझ्या पायावर उभे केले. माझी मुलगी आणि माझी पत्नी मदतीसाठी पुढे आली. डॉक्टरांनी मला ॲडमिट व्हायला सांगितले होते. तेव्हा सचिन तेडुंलकरने माझ्यावरील शस्त्रक्रियेचा खर्च केला होता. (Vinod Kambali Health)
विनोद कांबळीने १९९१ मध्ये भारतीय संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने १९९३ मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. तो भारतासाठी सर्वात जलद १००० कसोटी धावा करणारा फलंदाज होता. त्याने १४ डावात ही कामगिरी केली होती. पण, नंतर तो दिशा भरकटला आणि क्रिकेटमधून त्याचे लक्ष विचलित झाले. त्याने १७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १०८४ धावा केल्या आहेत आणि त्यामध्ये ४ शतकं व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने टीम इंडियासाठी १०४ वन डे सामन्यांमध्ये एकूण २४७७ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि १४ अर्धशतकं आहेत.
दरम्यान, विनोद कांबळीची अवस्था पाहून १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूंनी त्याला मदत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्याने स्वतः रिहॅब केंद्रात जावे, अशी अट त्यांनी ठेवली आहे. माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी विनोद कांबळी त्यांच्या मुलासारखा असून, ते त्याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Vinod Kambali Health)