Vinod Khute : VIPS Group Of Companies च्या विनोद खुटेचा पाय आणखी खोलात, ईडीने पुन्हा जप्त केले कोट्यावधी रूपये, गुंतवणूकदारांमध्ये उडाली मोठी खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । VIPS Group Of Companies च्या माध्यमांतून गुंतवणूकदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या तथाकथित उद्योजक विनोद खुटेचा (Vinod Khute) पाय आणखीन खोलात गेला आहे. ईडीने विनोद खुटे याच्या अहमदाबाद कार्यालयावर धाड टाकली आहे. (ED raids Vinod Khute’s Ahmedabad office) या धाडीत कोट्यावधी रूपये जप्त करण्यात आले आहेत. (Vinod Khute Latest News)
गेल्या महिनाभरात ईडीने दोनदा केलेल्या कारवाईत सुमारे 31.74 कोटी रूपये जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग कायद्यान्वये विनोद खुटे आणि त्याचे कुटुंबीय व इतर नातेवाईकांविरुध्द ईडीने ही कारवाई हाती घेतली आहे. ईडीने विनोद खुटे विरोधात जोरदार कारवाई हाती घेतल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Vinod khute news)
VIPS Group Of Companies च्या विरोधात ईडीने 25 मे 2023 पासून कारवाई हाती घेतली आहे. पहिल्या कारवाईत पुणे आणि अहमदनगर येथील कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली होती. यावेळी ईडीने 18.54 कोटींचे बँक बॅलन्स गोठवण्याची कारवाई केली होती. या प्रकरणातील आरोपी विनोद खुटे हा दुबई येथे वास्तव्यास आहे. (Vinod khute Dubai)
तथाकथित उद्योजक विनोद खुटे याने VIPS Group Of Companies च्या माध्यमांतून अनेक बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. त्यात क्रिप्टो एक्सचेंज सह वाॅलेट सेवेचा समावेश आहे. हवालाद्वारे तो परदेशात पैसे पाठवत होता. याशिवाय ई कॉमर्स शॉपिंग पोर्टलद्वारे तो उत्पादने विकायचा.
दरम्यान, विनोद खुटे हा VIPS Group Of Companies च्या माध्यमांतून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून देशभरातील गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करत असायचा. त्याच्या या योजनेचे सर्वाधिक एजंट शिक्षक वर्ग होता, असेही तपासात समोर आले आहे. VIPS Group Of Companies कंपनी बेकायदेशीर अन अनधिकृत मल्टी लेवल मार्केटिंग योजना चालवत होती, खुटे याने काना कॅपिटल ब्रोकर या कंपनीत विविध आमिषे दाखवून गुंतवणूकदारांकडून 125 कोटी रूपये निधी गोळा केल्याचा आरोप ईडीने केला आहे.यात अजूनही कोट्यावधी रूपयांची वाढ होऊ शकते, असे तपास यंत्रणेने म्हटले आहे.
तथाकथित उद्योजक विनोद खुटे याने पुण्यातील धनश्री मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या खोट्या योजनांमध्ये आकर्षित करण्याची योजना हाती घेतली होती. त्यासाठी तो गुंतवणूकदारांना आकर्षित करायचा.त्यामध्ये तो ज्यादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवायचा.अनेक गुंतवणूकदार त्याच्या या आमिषाला बळी पडले आहेत.या योजनेतून जमवलेली कोट्यावधीची रक्कम खुटे याने हवाला रॅकेट व शेल कंपनांद्वारे विदेशात पाठवली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात उडाली पुन्हा खळबळ
ईडीने 25 मे 2023 रोजी विनोद खुटे याच्या पुणे आणि अहमदनगर कार्यालयांवर छापेमारी करण्याची कारवाई केली होती.त्यावेळी गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. ईडीच्या कारवाईनंतर गुंतवणूकदारांकडून आमच्या पैश्यांचं काय ? अशी विचारणा विनोद खुटे आणि त्यांच्या नातेवाईकांना करण्यात येत होती. त्यामुळे विनोद खुटे याच्या कुटूंबातील सदस्य व एजंट कर्जत-जामखेड मतदारसंघातील ज्या गावांमधून गुंतवणूक आलीय तिथे जाऊन गुंतवणूकदारांच्या भेटी घेऊन तुमचे पैसे कुठे जाणार नाहीत, असे सांगताना दिसत होते. रात्री होणाऱ्या झूम मिटींगमध्ये गुंतवणूकदारांना अश्वासन दिले जायचे. अशी माहिती समोर येत आहे. त्यातच ईडीने खुटे याच्या अहमदाबाद कार्यालयावर छापेमारी केल्याने गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. ईडीने अहमदाबाद कार्यालयावर टाकलेल्या धाडीत 2 कोटींची रोकड जप्त केली आहे. तसेच 10.38 कोटींचा बँक बॅलन्स जप्त केला आहे.
कर्जत-जामखेडमधील गुंतवणूकदारांनो भूलथापांना बळी पडू नका
कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेकडो गुंतवणूकदारांनी VIPS Group Of Companies च्या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक शिक्षक या योजनेचे एजंट होते अशीही चर्चा आहे. या एजंटांनी अनेकांना या योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. काहींनी शेती विकून या कंपनीत गुंतवणूक केली आहे. ईडीच्या पहिल्या कारवाईनंतर कंपनीच्या समर्थकांकडून सोशल मिडीयावर बड्या बड्या बाता मारल्या जात होत्या, काळजी करू नका, चुटकी सरशी तुमचे पैसे मिळतील, शेअर मार्केटमध्ये कंपनीचे करोडो रूपये पडून आहेत. दुबईमध्ये अमूक आहे, तिकडे तमूक आहे. असे सांगितले जात होते, अशीही चर्चा आहे.
कंपनीकडे खरोखर हजारो कोटींचा बँक बॅलन्स असेल, कंपनीला गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर मग कंपनीने ज्या गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितले त्यांना तातडीने पैसे परत का केले नाहीत? का सातत्याने वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत? मतदारसंघातील शेकडो गोरगरिबांना कंपनीला फसवायचे आहे काय? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. कंपनीने या सर्व प्रकरणावर अजूनही आपली बाजू जनतेसमोर मांडलेली नाही.त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील नव्या गुंतवणूकदारांनो कोणत्याही आमिषाला – भूलथापांना बळी पडू नका, असेच आता जनतेत बोलले जात आहे.
कोण आहे विनोद खुटे ?
विनोद खुटे हा कर्जत तालुक्यातील रहिवासी आहे. VIPS Group Of Companies च्या माध्यमांतून त्याने ज्यादा परतावा देण्याची योजना आखून राज्यातील हजारो गुंतवणूकदारांचे लक्ष आपल्याकडे वेधले. त्याच्या या योजनेला भुलून गुंतवणूकदारांनी कोट्यावधीची गुंतवणूक त्याच्या कंपनीत केली. या कंपनीच्या मनी लाँड्रिंगच्या काळ्या कृत्यांची खबर ईडीला लागली. इडीने कंपनीच्या पुणे, अहमदनगर व अहमदाबाद या तीन ठिकाणी छापेमारी करत कोट्यावधी रूपये जप्त केले आहेत. ईडीचा या प्रकरणात सखोल तपास सुरू आहे. ईडीच्या या कारवाईमुळे तथाकथित मराठी उद्योजक विनोद खुटे याचे पाय आणखीन खोलात गेले आहेत, असेच या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.
ईडीने अत्तापर्यंत जप्त केले 31.74 कोटी
ED ने 16.06.2023 आणि 17.06.2023 रोजी अहमदाबाद येथे VIPS ग्रुप ऑफ कंपनीज आणि M/s ग्लोबल एफिलिएट बिझनेसद्वारे विनोद खुटे आणि त्यांच्या नातेवाईकांद्वारे व्यवस्थापित आणि नियंत्रित केलेल्या FEMA उल्लंघनाच्या संदर्भात शोध घेतला. त्यात रु.2 कोटींची रोकड आणि रु.10.38 कोटींची बँक शिल्लक जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील एकूण जप्ती आजच्या तारखेनुसार रु.31.74 कोटी आहे, असे ट्विट इडीने केले आहेत.