VIPS Group Of Companies ED Raid : विनोद खुटे ईडीच्या रडारवर, ईडीची पुणे अहमदनगरमध्ये छापेमारी, कर्जत-जामखेडसह राज्यातील गुंतवणूकदारांमध्ये उडाली मोठी खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत-जामखेड मतदारसंघासह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना अल्पावधीत व्हीआयपीएस (VIPS Group Of Companies) कंपनीच्या विविध योजनांमध्ये आकर्षित करणारा तथाकथित उद्योजक विनोद खुटे (Vinod khute ) हा ईडीच्या रडारवर आला आहे. ईडीने व्हीआयपीएसच्या (VIPS Group Of Companies) अहमदनगर आणि पुणे येथील कार्यालयांवर छापेमारी केली आहे.ईडीच्या या कारवाईमुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
ईडीने व्हीआयपीएस (VIPS Group Of Companies) कंपनीच्या अहमदनगर, पुणे येथील कार्यालयावर 25 मे रोजी छापेमारी केली. गेल्या आठवड्याभराच्या कारवाईनंतर या कंपनीची १८ कोटी ५४ लाख रुपये ईडीने जप्त केले आहेत. फेमा कायद्यानुसार व्हीआयपीस कंपनीचे मालक विनोद खुटे व इतरांविरुध्द ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.याबाबतची अधिकृत माहिती ईडीकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. विनोद खुटे (vinod khute news) व त्याच्या इतर नातेवाइकांविरोधात फेमा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
विनोद खुटे हा सध्या दुबईत राहत आहे. बेकायदेशीरपणे व्यवसाय करणे, क्रिप्टो एक्सचेंज, वॉलेट सर्व्हिस असे व्यवसाय व्हीपीएस ग्रुप ऑफ कंपनीकडून करण्यात येत होते. यातील आलेले पैसे बेकायदेशीरपणे हवालामार्फत अनेक देशांमध्ये पाठविण्यात येत असल्याचे ईडीच्या कारवाईतून उघडकीस आले आहे. ॲफेलेटिंग मार्केटिंगद्वारे वस्तूंची विक्री केली जात होती.
त्यासाठी ई कॉमर्स शॉपिंग पोर्टलचा वापर करण्यात येत होता. ग्लोबल अफिलेट बिझनेस (Global Affiliate Business) द्वारे मल्टिलेव्हल मार्केटिंग स्कीम राबविण्यात येत होत्या. हा चेन मार्केटिंगचा प्रकार आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांकडून 125 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
या ग्रुपची कना कॅपिटल ही कंपनी आहे. या कंपनीमार्फत गुंतवणूक करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. या कंपनीचे व्हीआयपीएस वॉलेट, व्हीआयपीएस फिनस्टॉक नावाचे व्यवसाय आहेत. त्यातून क्रिप्टो विक्री, शेअरची खरेदी विक्रीचे व्यवहार केले जात होते. धनश्री मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आलेली आहे.
ग्लोबल ॲफिलिट बिझनेस कंपनीबरोबर अनेक बनावट कंपन्या (शेल) उभारण्यात आलेल्या आहेत. त्याद्वारे १२५ कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे. गुंतवणूक केल्यास जास्त व्याज, कमिशन देण्याची नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे. ईडीच्या चौकशीत वेगवेगळ्या बँक खात्यात १७. ५४ कोटी रुपये असल्याचे आढळून आले आहे. ही रक्कम ईडीने गोठवली आहे.
ईडीच्या रडारवर आलेला विनोद खूटे हा कर्जत-जामखेड मतदारसंघातील रहिवासी आहे. त्याने याच मतदारसंघातील आपल्या इतर नातेवाईकांना सोबत घेत व्हीआयपीएस (VIPS Group Of Companies) कंपनीची सुरुवात केली. त्या सर्वांनी मिळून गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सदर कंपनीत कोट्यावधीची गुंतवणूक घडवून आणली. सदर कंपनीच्या योजनेला शिक्षक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात भूलले आहेत. ईडीने विनोद कुटे आणि त्याच्या इतर नातेवाईकांविरुध्द फेमा कायद्यानुसार कारवाई हाती घेतली आहे. ईडीच्या कारवाईत आणखीन कोण कोणत्या गोष्टींचा गौप्यस्फोट होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, व्हीआयपीएस (VIPS Group Of Companies) कंपनीच्या आकर्षक योजनांना बळी पडून गुंतवणूकदारांनी सदर कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. परंतू सदर कंपनी ईडीच्या रडारवर आल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेषत: कर्जत-जामखेडमधील गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात धाबे दणाणले आहेत.
काही महिन्यांपुर्वी बार्शीच्या विशाल फटे याचा असाच कारनामा समोर आला होता. त्याने गुंतवणूकदारांची कोट्यावधी फसवणूक केली होती. त्यानंतर पुण्यातील एका शेअर ब्रोकरने शेअर मार्केटच्या नावाखाली राज्यातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जमा केली होती. त्यातही अनेकांची मोठी फसवणूक झाली. फसवणूक झालेल्यांमध्ये जामखेड तालुक्यातील अनेक शिक्षकांचा समावेश आहे. विनोद खुटे याच्या VIPS Group Of Companies कंपनीत कर्जत-जामखेडमधील अनेक शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक तर केलीच शिवाय काही शिक्षक VIPS Group Of Companies कंपनीचे एजंट होते, या शिक्षकांनी मोठ्या VIPS Group Of Companies मध्ये गुंतवणूक करत मोठ्या प्रमाणात कमिशन लाटले, अशी चर्चा आता कर्जत-जामखेड मतदारसंघात सुरु आहे.