जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून 10 सप्टेंबरपासून जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.हे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आदेश जारी केले आहेत.
(Restriction order issued under section 37 (1) (3) of Maharashtra Police Act on the background of Ganeshotsav in Ahmednagar district )
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून 10 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या कालावधीसाठी जारी करण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) च्या प्रतिबंधात्मक आदेशात म्हटले आहे की, सध्या जगभरात व राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट चालु आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोविड रुग्ण इतर जिल्ह्याच्या तुलनेनुसार जास्त वाटत असल्याचे दिसुन येत आहे.
शासनाकडील ब्रेक द चैन सुधारित मार्गदर्शक सुचना नुसार कोविड ॲप्रोप्रिएट बिहेविअरचे पालन करणे बाबतचे आदेश अहमदनगर जिल्ह्यासाठी दि. 15/08/2021 पासुन पुढील आदेश होईपावेतो आदेशीत केले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 चे आदेश यापूर्वी निर्गमित केले होते ते आता शिथील करण्यात आले आहे.
परंतु 10/09/2021 ते 19/09/2021 या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सवादरम्यान समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून किरकोळ कारणावरून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाकडून गणेशोत्सव मिरवणूकीत, धार्मिक कार्यक्रमात गर्दी करु नये तसेच गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष दर्शन घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे.याबाबत शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना सूचना दिलेल्या आहेत.
शासनाच्या गणेशोत्सव मिरवणूक मनाई व प्रत्यक्ष मुखदर्शन न घेणे बाबतच्या आदेशा विरुध्द विविध संघटना, राजकिय पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी करुन प्रशासनास वेठीस धरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच जिल्ह्यामध्ये विविध राजकिय पक्ष, कामगार संघटना तर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रस्ता रोको कार्यक्रम घेवून मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर अहमनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसांना कर्तव्य बजावतांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) चे अन्वये दि. 10/09/2021 रोजीचे 00.01 वा. पासुन ते दि. 24/09/2021 रोजीचे 24.00 वा. पावेतो प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेबाबत पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी त्यांचेकडील दि. 09/09/2021 रोजीचे पत्राअन्वये विनंती केली आहे.
त्याअर्थी वरील पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने पोलीसांना कर्तव्य बजावतांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.
खालील कृत्ये करण्यास करण्यात आली मनाई
अ) शस्त्रे, काठ्या, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे.
ब) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधणे जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे.
क) कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.
ड) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे.
इ) जाहीरपणे घोषणा देणे.
ई) सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तरी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तु तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे.
फ) सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस, मिरवणुका काढणेस मनाई करीत आहे.
वरील आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत.
अ) शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.
ब) प्रेतयात्रा / अंत्यविधीस सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करून या कार्यालयाने / शासनाने / संबंधित स्थानिक प्राधिकारणाने वेळोवेळी कोरोना विषाणूचे अनुषंगाने निर्ममित केलेल्या आदेशान्वये नमूद मर्यादित व्यक्तींची उपस्थिती.
क) लग्नसमारंभ सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करुन या कार्यालयाने / शासनाने संबंधित स्थानिक प्राधिकारणाने वेळोवेळी कोरोना विषाणूचे अनुषंगाने निर्ममित केलेल्या आदेशान्वये नमूद मर्यादित व्यक्तींची उपस्थिती.
ड) नमूद कालावधीकरीता शासनाकडून / या कार्यालयाकडून संबंधित स्थानिक प्राधिकरणाव्दारे कोरोना विषाणू प्रोटोकॉलचे अनुषंगाने वेळोवेळी निर्ममित करण्यात आलेल्या आदेशामध्ये सवलत दिलेल्या बाबींस / व्यक्तींस प्रस्तुतचा आदेश अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत दि. 10/09/2021 रोजीचे 00.01 वा. पासुन ते दि. 24/09/2021 रोजीचे 24.00 वा. पावेतोचे कालावधीत जारी राहील.