स्वराज्य ध्वज यात्रेचा कर्जतमध्ये दिमाखदार शुभारंभ, तुफान गर्दीत स्वराज्य ध्वज यात्रेचे प्रस्थान !
रोहित पवार उभारणार जगातील सर्वांत उंच ध्वज
अहमदनगर, ९ सप्टेंबर: रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरात गुरूवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ध्वजाचे पूजन करण्यात आले. आमदार रोहित पवार यांनी पुष्पाभिषेक करून ध्वजाचे पूजन केले.या पूजनानंतर स्वराज्यध्वज यात्रेस सुरूवात करण्यात आली. १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वराज्यध्वज पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे.
भगव्या ध्वजावरून विविध राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या हाणामारीच्या वातावरणात युवानेते आमदार रोहित पवार यांनी स्वराज्याचा भगवा ध्वज आपल्या खांद्यावर घेतला आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील ६ राज्ये, ७४ प्रेरणास्थळे असा महत्वाकांक्षी प्रवास करून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा ७४ मीटर लांबीचा आगळा-वेगळा भगवा ध्वज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज असणार आहे.
स्वराज्यध्वज हा स्वराज्याचा, सर्व जातीधर्मांच्या लोकांचा ध्वज असून आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकसहभागातून परंतु कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करून हि ध्वज यात्रा पुढील ३७ दिवस चालणार आहे, असं यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी यात्रा
निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प रोहित पवार यांनी केला आहे. याच प्रेरणेतून किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर देशप्रेमाची असीम ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा शौर्याचं प्रतिक असा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे.
दरम्यान, पुष्पवर्षावाने सुरूवात झालेल्या स्वराज्यध्वज यात्रेचं आज ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या स्वराज्य ध्वज यात्रेच्या पूजन कार्यक्रमात तसेच परिक्रमेत अश्वारूढ पथक, गज नृत्य गट, ढोलताशा पथक, हलगी व संबळ वादक, कलशधारी महिलांचाही सहभाग होता. याप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवावर्ग तसेच स्थानिक उपस्थित होते.
ही स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे.
स्वराज्य ध्वज कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व रोहित पवार यांच्यासोबत जुडण्यासाठी इथे क्लिक करून नोंदणी करा किंवा कॉल करा- 9696330330