Karjat Nagar Panchayat election 2021 | कर्जत नगरपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीवर विक्रमी हरकती दाखल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagar Panchayat election 2021) प्रारूप मतदार यादीवर ५७२ अर्जाद्वारे ६ हजार ३९३ हरकती घेण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव (Govind Jadhav) यांनी दिली आहे.

आलेल्या सर्व हरकतीची प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहानिशा करून त्या दि २९ अखेर निकाली काढून प्रसिद्ध करण्यात येईल. सदर हरकतीच्या चौकशीसाठी तालुका प्रशासन शनिवारपासून कामास लागले आहे.

कर्जत नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून प्रशासनाने त्यासाठी कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने कर्जत नगरपंचायतीच्या १७ प्रभागाच्या प्रारूप मतदारयादी जाहिर करण्यात आली होती. त्यावर शुक्रवार दि २६ अखेर हरकती घेण्याची मुदत ठेवण्यात आली होती.

शुक्रवार अखेर ५७२ अर्जाद्वारे एकूण ६ हजार ३९३ हरकती नोंद केली असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी पत्रकारांना दिली.

या प्राप्त झालेल्या हरकतीवर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्यावतीने योग्य माहितीच्या आधारे आणि पुराव्यानुसार निकाली काढण्यात येतील.

त्यानंतर दि २९ रोजी अंतिम प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल असे जाधव म्हणाले.

कर्जत नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे 

दि १ डिसेंबर ते ७ डिसेंबर – उमेदवारी अर्ज दाखल करणे,

दि ८ डिसेंबर – प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी,

दि ९ ते १३ डिसेंबर – उमेदवारी अर्ज माघार घेणे,

दि २१ डिसेंबर – मतदान

दि २२ डिसेंबर – मतमोजणी