जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड- स्वारगेट बसमधून प्रवास करत असलेल्या एका 70 वर्षीय वृध्द महिलेला हार्ट अॅटॅक आल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना अरणगाव येथे घडली. अरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पुर्णवेळ डाॅक्टर उपलब्ध असता तर सदर महिलेचे प्राण वाचले असते. अरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पुर्णवेळ डाॅक्टर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अरणगावचे सरपंच लहू शिंदे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, श्रीगोंदा येथील रहिवासी असलेल्या हारुबाई गंगाराम दांडेकर (वय 70) ह्या शनिवारी सकाळी जामखेड – स्वारगेट ( एम एच 14 बी टी 4168) या बसने पाटोदा (ग) येथून श्रीगोंद्याकडे निघाल्या होत्या. सदर बस अरणगावमध्ये आल्यानंतर त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. सदरची बाब बसवाहक सुभाष नागरगोजे यांच्या लक्षात आली. त्यांनी ही बाब बसचालक ईश्वर सानप यांना सांगितली.
बसचालक सानप यांनी तातडीने अरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बस नेली. त्यावेळी चालक व वाहक डाॅक्टरांकडे धावत गेले. तत्पुर्वी सदर वृध्द महिलेच्या बचावासाठी गाडीतील प्रवाश्यांनी प्रयत्न केले.आरोग्य केंद्रात पुर्णवेळ डाॅक्टर उपलब्ध नव्हते.उपस्थित कर्मचाऱ्यांनी सदर महिलेस ॲम्ब्यूलन्सद्वारे पुढील उपचारास पाठवले. पण दुर्दैवाने त्या महिलेचा पाटोद्यातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
जामखेड – स्वारगेट ही बस सकाळी सहा वाजता जामखेडहून सुटली होती. या बसमध्ये एकुण 15 प्रवासी प्रवास करत होते. मयत हारुबाई गंगाराम दांडेकर ह्या पाटोदा (गरडाचे) येथील बाबासाहेब शिकारे यांच्या आजी होत्या. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गेल्या काही दिवसांपासून पुर्णवेळ डाॅक्टर उपलब्ध नाही. येथील अनेक पदे रिक्त आहेत. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर आरोग्य केंद्राचा कारभार हाकला जात आहे. येथील आरोग्य सेवा पुर्णपणे कोलमडून गेली आहे. अरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत तसेच तातडीने पुर्णवेळ डाॅक्टरची नेमणूक करावी अशी मागणी अरणगाव ग्रामस्थांमधून होत आहे.