karjat News : एकतर्फी प्रेम प्रकरणातून विद्यार्थिनीची हत्या, परीक्षेसाठी मामाच्या गावात आलेल्या भाचीचा करूण अंत !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलींचे आयुष्य उध्वस्त करणारे महाभाग समाजात कमी नाहीत. एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलींच्या हत्या करण्याचे प्रकार समाजात दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक खळबळ उडवून देणारी एक घटना कर्जत तालुक्यातून समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाने एकतर्फी प्रेम प्रकरणातून १७ वर्षीय मुलीचे आयुष्यच उध्वस्त केले आहे. या घटनेत आरोपीने सदर तरूणीच्या पोटात चाकू भोकसून हत्या केली आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेतील आरोपीने स्वता:च्या पोटात चाकू भोसकून घेतला आहे. तो जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर- भेकराईनगर भागात वास्तव्यास असलेल्या श्रावणी मोहन पाटोळे (मुळ गाव म्हसेवाडी ता करमाळा) वय 17 वर्ष 5 महीने या तरूणीने कर्जत शहरातील समर्थ कॉलेजला प्रवेश घेतला होता. तिचे या काॅलेजला शिक्षण सुरू होते. 12/01/2024 रोजी तीची समर्थ कॉलेज येथे परीक्षा असल्याने ती कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे सचिन महादेव काळे (मामा) यांच्या घरी आली होती. 16 रोजी दुपारी चारच्या सुमारास श्रावणी घरात झोपलेली असतानाच प्रतिक लक्ष्मण काळे (वय 22) रा राक्षसवाडी बुद्रुक हा तिला भेटण्यास गेला. त्याने श्रावणीच्या पोटात चाकूने वार केले. यात ती गंभीर जखमी होऊन मृत झाली. यावेळी आरोपी प्रतिक याने श्रावणीवर हल्ला केल्यानंतर स्वता:च्या पोटात चाकूने वार केले त्याचबरोबर कसले तरी विषारी औषध घेतले. या घटने आरोपी जखमी झाला. त्याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत.
मयत श्रावणीचे मामा सचिन काळे यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, माझी बहिण कुटुंबासह भेकराईनगर, हडपसर पुणे येथे वास्तव्यास आहे, तीची मुलगी श्रावणी मोहन पाटोळे हिने समर्थ कॉलेज कर्जत येथे प्रवेश घेतला असुन तीची समर्थ कॉलेज येथे परीक्षा असल्याने ती दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी आमच्या घरी आली होती. 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 06 च्या सुमारास मी तिला मोटार सायकलवरून कुळधरण येथे आणुन सोडले तेथुन ती एस टी बसने समर्थ कॉलेज कर्जत येथे पेपरसाठी गेली. पेपर देवुन ती कर्जत येथुन कुळधरणमध्ये एस टी बसने आली होती तेथुन मी तिला माझ्या मोटार सायकलवर दुपारी 02/00 वा सुमारास आमचे घरी आणून सोडले होते.
त्यानंतर माझी आई शेतात कामासाठी गेली व भाची श्रावणी हि घरामध्ये झोपली होती. त्यानंतर दुपारी 04 च्या सुमारास मला सोनबा उत्तम काळे याने फोन करुन सांगितले की, श्रावणी हिचा ओरडल्याचा आवाज येतोय, त्यानंतर मी, चुलती अदिका, भावजय सुरेखा असे पळत घराकडे गेलो असत् श्रावणी ही घराचे बाहेर आंगणात पडलेली होती. तीच्या जवळ जावुन पाहीले असता तीच्या पोटातुन रक्त येत होते. तसेच घरामध्ये प्रतिक लक्ष्मण काळे रा. राक्षसवाडी बुटुक ता कर्जत हा त्याचे स्वता:चे पोटामध्ये चाकु मारुन रक्ताचे थारोळ्यात पडलेला आहे.
मी तात्काळ घरी जावुन पाहीले असता माझी भाची श्रावणी हिच्या पोटात चाकू मारल्याने ती बेशुध्द पडलेली होती. व प्रतिक ने स्वता:चे पोटात चाकू मारुन घेतला होता त्याचबरोबर त्याच्या जवळ काहीतरी विषारी औषध पिवुन तो जखमी अवस्थेत दिसला. त्यावेळी मी, प्रतिकचे वडील लक्ष्मण हरीबा काळे असे आम्ही आमचे शेजारी राहणारे नवनाथ लष्करे याचे चारचाकी गाडीमध्ये दोघांनाही घेवुन उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे उपचारासाठी दखल केले. वैद्यकिय अधिकारी यांनी श्रावणीची तपासणी केली असता ती मयत झाली असल्याचे त्यांनी सांगितले व जखमी प्रतिक काळे यास पुढील उपचाराकरीता अहमदनगर येथे हलविण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढे फिर्यादीत म्हटले आहे की,माझी भाची श्रावणी ही माझ्या घरात झोपलेली असताना माझ्या घराशेजारी राहणारा प्रतिक लक्ष्मण काळे याने एकतर्फी प्रेमातुन श्रावणी झोपत असताना तीच्या पोटात चाकु मारुन तिला जखमी करुन तिचा खून केला, तसेच स्वता: काहीतरी विषारी औषध पिवुन तसेच चाकुने स्वता:च्या पोटात चाकू मारून घेतला. आरोपी प्रतिक विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत पोलिस करत आहेत.