गणरायाच्या आरतीचा मान मुस्लिम बांधवाला, सामाजिक कार्यकर्ते गफ्फारभाई पठाण यांच्या हस्ते पार पडली गणरायाची आरती !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । यंंदा महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. समाजातील सर्व घटक एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करत आहेत. सध्या गणरायाच्या आरतीसाठी विविध मंडळांकडून राजकीय नेते, अधिकारी, प्रतिष्ठितांना आमंत्रित केले जात आहे. पण काही मंडळांकडून मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणरायाची आरती करून हिंदू – मुस्लिम एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदू – मुस्लीम एकतेचे अनोखे दर्शन घडत आहे. यातून शिवरायांच्या विचारांचा कृतिशील जागर होताना दिसत आहे.
जामखेड तालुक्यात यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे.संपुर्ण तालुक्यात मंगलमय वातावरण आहे.जामखेड शहरातील मोरया ग्राफिक्स युवा मंच तसेच पिंपरखेड येथील धर्मयोद्धा युवा मंच यांच्या वतीने मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते गफ्फारभाई पठाण यांना गणपती आरतीचा मान देण्यात आला. पठाण यांच्या हस्ते गणरायाची आरती संपन्न झाली. यातून हिंदू – मुस्लिम एकात्मतेचे अनोखे दर्शन घडले.
यावेळी मोरया ग्राफिक्सचे मंगेश काकडे, कृष्णा चव्हाण, धर्मयोद्धा युवा मंचचे आबासाहेब ढवळे, अरुण ढवळे, देविदास लाढाणे सह आदी यावेळी उपस्थित होते.
कोण आहेत गफ्फारभाई पठाण ?
गफ्फारभाई पठाण हे जामखेड तालुक्यातील पाटोदा गरड या गावचे माजी सरपंच आहेत. सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रीय असताना. कुठलाही सण असो, समारंभ असो, यात ते नेेहमी हिरीरीने भाग घेतात. तसेच सुख असो किंवा दु:ख असो ते सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पठाण हे दरवर्षी आषाढी कार्तिकीला पंढरपूरला दिंडी घेऊन जातात. तसेच गावात कुठलाही सण उत्सव असो ते अतिशय धुमधडाक्यात साजरा करतात. गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. जाती धर्माच्या भिंती तोडून सर्वांना सोबत चालणारं नेतृत्व म्हणून गफ्फारभाई पठाण जामखेड तालुक्यासह शेजारील तालुक्यांमध्ये परिचित आहेत.
गणपती बाप्पाची आरती करण्याचा मान मिळत आहे, हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण – गफ्फारभाई पठाण
लहानपणापासून गणेशोत्सव हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण राहिला आहे. धर्माने मुस्लिम जरी असलो, तरी शालेय जीवनात सर्वधर्म समभावाची शिकवण मिळाली. आपण सर्वजण भारतीय आहोत. वारकरी पंथात मानवता धर्माला मोठे महत्व आहे. जात, धर्म, पंत या पलीकडे जावून माणूस म्हणून आपण मानवतावाद जोपासला पाहिजे यासाठी सदैव प्रयत्न असतो, म्हणूनच जाती धर्माच्या बेड्या तोडून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला गणपती बाप्पाची आरती करण्याचा मान मिळत आहे, हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी व्यक्त केली.