कर्जत : आमदार प्रा राम शिंदे यांच्या मागणीनुसार 5 मार्च रोजी सुटणार कुकडीचे उन्हाळी आवर्तन, कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रब्बी हंगाम 2022-23 साठी कुकडी व घोड प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंजुर नियोजनाप्रमाणे कर्जत तालुक्यासाठी कुकडीचे उन्हाळी आवर्तन येत्या 5 मार्च 2023 रोजी सुटणार आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी रब्बी हंगाम नियोजन बैठकीवेळी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार सदरचे आवर्तन सोडले जाणार आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे.
कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबर 2022 रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत 2022 – 23 च्या रब्बी हंगामासाठी कुकडी व घोड प्रकल्पाच्या आवर्तनाचे नियोजन आखण्यात आले होते. सदर बैठक सुरु असताना आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यासाठी तीन आवर्तने सोडण्यात यावेत अशी लेखी मागणी केली होती. या मागणीनुसार कर्जत तालुक्यासाठी कुकडी डावा कालवा उन्हाळी आवर्तन क्र- 1 कालवा सल्लागार समीतीच्या मंजूरीनूसार 5 मार्च 2023 रोजी सुरु करण्याची मागणी आमदार प्रा राम शिंदे यांनी 1 मार्च 2023 रोजी पुण्याच्या कुकडी सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता यांना पत्र पाठवून केली आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांनी पुण्याच्या कुकडी सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कुकडी डावा कालव्याचे रब्बी आवर्तन व उन्हाळी आवर्तन सन 2022-23 सोडणेबाबत कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबर 2022 रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये सन 2022-23 चे कुकडी डावा कालव्याचे रब्बी आवर्तन 1 जानेवारी 2023 ला सोडणे व उन्हाळी आवर्तन क्र-1 दिनांक 5 मार्च 2023 ला सोडण्याचे नियोजन मंजूर आहे.
कुकडी कालव्याचे रब्बी आवर्तन जानेवारी महिन्यात मिळाल्याने माझ्या कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना यांना वेळेवर पाणी मिळाले. आज रोजी कुकडी लाभक्षेत्रातील पाझर तलाव व बंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. आता उन्हाळी हंगाम सुरु झाला असुन तापमान खुप वाढले आहे. त्यामुळे सध्यस्थितीत शेतातील उभ्या चारा पिकांना व फळबागांना पाण्याची अत्यंत गरज आहे. कुकडी कालव्याचे पाणी लवकरात लवकर मिळणेबाबत लाभक्षेत्रातील शेतकरीही खुपच आग्रही आहेत.त्यामुळे कालवा सल्लागार समीतीमध्ये ठरल्याप्रमाणे उन्हाळी आवर्तन 5 मार्च 2023 रोजी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार प्रा राम शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, कर्जत तालुक्यातील जनतेला कुकडीचे पाणी पुर्ण दाबाने मिळावे यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे नेहमी आग्रही असतात. मात्र आमदार रोहित पवार यांच्याकडून कुकडीच्या पाण्याचे नियोजन फसल्याने मागील तीन वर्षांत शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने पाणी मिळाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आमदार प्रा राम शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर कुकडी प्रकल्पातील ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कर्जत तालुक्यातील सर्वच लहान मोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी आनंदून गेला होता. आता उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र होण्याआधीच आमदार प्रा राम शिंदे यांनी कुकडीचे पहिले उन्हाळी आवर्तन वेळेत सोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या 5 मार्च 2023 रोजी आवर्तन सुटणार आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.