जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जत जामखेड मतदारसंघात 20 कोटींच्या जलसंधारण कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. (Administrative approval for 20 crore water conservation works in Karjat Jamkhed constituency)
जलसंधारण महामंडळाची वरिष्ठ पातळीवरील उच्चस्तरीय बैठक अहमदनगर येथे नुुकतीच पार पडली होती. य बैठकीमध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील बंधाऱ्या संदर्भातील एकूण 26 कामे सुचवण्यात आली होती.
तसेच संबंधित कामांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. यामध्ये कर्जत तालुक्यातील 16 कामे तर जामखेड तालुक्यातील 10 कामांचा समावेश होता. बैठकीत झालेल्या चर्चेत दोन्ही तालुक्यातील मिळून जवळपास 20 कोटींच्या कामांचे अंदाजपत्रक मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते, त्यास आता शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत जामखेड मतदारसंघात यापूर्वी बंधाऱ्याच्या दुरुस्तीची व देखभालीची विविध कामे करण्यात आली आहेत, बंधाऱ्यातून गळणारे पाणी थांबवण्यासाठी जलसंपदा, जलसंधारण व जि.प च्या माध्यमातून 150 पेक्षा अधिक कामे मंजूर असून ती कामे देखील प्रगतीपथावर आहेत.
मतदारसंघात पावसाचे पडणारे पाणी जास्तीत जास्त जमीनीत जिरावं त्याचा फायदा आसपासच्या शेतकऱ्यांना व्हावा यासाठी आम्ही जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करत आहोत त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर मृद व जलसंधारण मंत्री गडाख तसेच जिल्हा व तालुक्याचे अधिकारी यांचे या सगळ्यांमध्ये मोठे सहकार्य लाभत आहे असे आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले.