जामखेडची नागपंचमी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज  – तहसीलदार योगेश चंद्रे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात प्रसिध्द असलेली जामखेडची नागपंचमी यात्रा (Nag Panchami Yatra 2022) यंदा मोठ्या धुमधडाक्यात साजरी होणार. कोरोनामुळे मागील दोन वर्षे ही यात्रा झाली नव्हती. यंदा होणाऱ्या यात्रेच्या नियोजनासाठी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीकडे नागरिकांनी पाठ फिरवली. मोजके पदाधिकारी आणि नागरिक बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. उपस्थितांनी अनेक महत्वाच्या सुचना केल्या. प्रशासनाने या सुचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचा शब्द दिला. 

शांतता कमिटीच्या बैठकीत ज्या गोष्टींवर चर्चा होते त्या गोष्टींची त्वरीत अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत. जामखेडची यात्रा विना अडथळा व्हावी यासाठी येत्या आठवडाभरात सर्व उपाययोजना पुर्ण होतील यासाठी प्रशासन सज्ज आहे नागरिकांकडून आलेल्या सूचनांची गंभीर दखल घेतली जाईल असे प्रतिपादन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.

जामखेड पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आज शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,  महावितरणचे योगेश कासलीवाल, बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, सह आदी पदाधिकारी व मोजकेनागरिक उपस्थित होते.

शांतता कमिटीच्या बैठकीकडे नागरिकांची कमी उपस्थिती होती. यावर बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, ज्या गोष्टी आपण शांतता कमिटीत मांडता त्या प्रमाणे जर कारवाई होत नसेल तर शांतता कमिटीत लोक उपस्थित राहत नाहीत, शांतता कमिटीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी झालीच नाही तर शांतता कमिटीचे स्वरूप काही उपयोगाचे नाही. त्यामुळे आता सर्व प्रशासकीय प्रमुखांबरोबर घेऊन शांतता कमिटीच्या बैठकीत ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्याची अंमलबजावणी केली जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना दिला.

दरम्यान या बैठकीत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, अविनाश बोधले सह आदींनी महत्वाच्या सुचना मांडल्या.