Ahmednagar Breaking : कर्जत राष्ट्रवादीत उडाला भडका, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या विरोधात आमदार रोहित पवार समर्थकांची जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या विरोधात आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांमधून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच रोहित पवार समर्थकांनी फाळके यांच्या बंगल्याच्या भिंतीवर गद्दार असा शब्द लिहण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संचालकांनी गद्दारी केल्याने पडसाद कर्जतमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. कर्जत मधील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या बंगल्याच्या कंपाऊंड समोर आमदार रोहित पवार यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी करत निदर्शने केली.
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी फाळके यांच्या बंगल्याच्या वाॅल कंपाऊंडवर गद्दार हा शब्द तीन ठिकाणी लिहून व फुल्या मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकुणच कर्जतमध्ये राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी हा संघर्ष भडकल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
कर्जत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संचालकांनी गद्दारी केल्याने त्याचे जोरदार पडसाद आज कर्जतमध्ये उमटले. कर्जतमधील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या बंगल्याच्या कंपाऊंडवर राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी करत गदार हा शब्द तीन ठिकाणी लिहून व फुल्या मारून जोरदार निदर्शने केली.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाचे ९ समर्थक तर राष्ट्रवादी व काँग्रेसचे ९ समर्थक निवडून आले होते. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत जामखेडप्रमाणेच ईश्वरचिठ्ठीद्वारे सभापती उपसभापती निवडले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती, परंतू पदाधिकारी निवडी वेळी रहस्यमय घडामोडी घडल्या आणि सभापती व उपसभापती निवडीत राष्ट्रवादी व काँग्रेसला जोरदार धक्का बसला.भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले.
राष्ट्रवादीच्या एक किंवा दोन संचालकांनी रहस्यमयरित्या भाजपला मदत केली.त्यामुळे बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकला.या निकालाचा जोरदार धक्का आ.रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांना बसला होता.भाजपने बाजार समितीवर कब्जा मिळवताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याचे पडसाद आज कर्जतमध्ये उमटले.
कर्जतमधील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या कर्जत नगर रोड वरील पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या भव्य बंगल्याच्या ठिकाणी आज दि १३ जून रोजी दुपारी राष्ट्रवादीच्या अर्थात रोहित पवार समर्थक 15 ते 20 संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी करत गोंधळ घातला.यावेळी या संतप्त कार्यकर्त्यांनी फाळके यांच्या बंगल्याच्या कंपाऊंडवर काळ्या स्प्रे द्वारे गद्दार हा शब्द तीन ठिकाणी लिहीला व काही फुल्या ही मारल्या.
यावेळी उपस्थित अनेक कार्यकर्ते जोरदार घोषणबाजी ही करत होते. कोण गेला रे कोण गेला ..राष्ट्रवादीचा गद्दार गेला यासह आ. रोहितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली. काही वेळातच सदर लिहिलेले शब्द व फुल्या पुसण्यात आले.
या प्रकाराबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना विचारले असता बाजार समिती मधील प्रकार चुकीचा आहे त्याबाबत सखोल चौकशी केली जाईल. आज आम्ही सर्व जण घरातच होतो. त्यावेळी कोणी तरी अज्ञात व्यक्तीने काही तरी लिहिले आहे हा अत्यंत किरकोळ प्रकार असल्याचे म्हटले.