जामखेड टाईम्स वृत्तसेवा, 31 ऑक्टोबर 2021 । अहमदनगर जिल्ह्यामधील, धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे येथे नागरिकांची जास्त गर्दी होणार नाही, त्यासाठी संबंधित प्रांताधिकारी, तहसिलदार आणि गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पथकाची नेमणूक करावी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, या बाबतचे नियोजन स्थानिक प्रशासनाने करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. (Ahmednagar District administration on action mode to prevent congestion at religious and tourist sites)
जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत करताना धार्मिक स्थळी, पर्यटन स्थळे तसेच कोणत्याही कार्यक्रमात, नागरीकांची जास्त गर्दी होणार नाही तसेच, सामाजिक अंतर पाळले जाईल व कोविडच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी, यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीतभोसले बोलत होते.
यावेळी बैठकीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राजेंद्र शिरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. रामटेके, निवासी उपजिल्हाधिकारी, संदीप निचित, आरोग्य विभाग आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भोसले म्हणाले, जिल्ह्यामधील, धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे येथे नागरिकांची जास्त गर्दी होणार नाही, त्यासाठी संबंधित प्रांताधिकारी तहसिलदार आणि गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी, नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पथकाची नेमणूक करावी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, या बाबतचे नियोजन स्थानिक प्रशासनाने करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही, याबाबत पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. त्याबाबतचा अहवाल प्रशासनास सादर करावा.
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी. तसेच कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढले पाहिजे यासाठी नियोजन करावे, गावात व तालुक्यात 100% लसीकरण लवकर कसे पूर्ण होईल, याबाबत नियोजन करावे.
संभाव्य तिसरा लाटेचा धोका लक्षात घेता आणि जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या या दृष्टीने आरोग्य विभागाने रुग्णालयातील बेडची संख्या, ऑक्सिजन व्यवस्था, अतिदक्षता विभागातील सेवा सुविधा, औषधसाठा याबाबत सुद्धा नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी सतर्क रहावे,
आरोग्य विभागाने रुग्णालयातील फायर ऑडिट, सेफ्टी ऑडिट, स्ट्रक्चर ऑडिट बाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना ही त्यांनी बैठकीत दिल्या. कोविड आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला शासनातर्फे जाहीर केलेल्या 50 हजार रुपये आर्थिक मदतीबाबतच्या प्रकरणांचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. या बैठकीत महसूल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कामकाजाचा सुध्दा आढावा घेण्यात आला.