जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्यातील नान्नज सोसायटीच्या पिक कर्ज नुतनीकरण क.म. प्रस्तावास मंजुरी देण्यास जिल्हा बँक आणि जामखेड तालुका विकास अधिकारी कार्यालयाकडून टाळाटाळ केली जात होती. याबाबत माजी सभापती तथा नान्नज सेवा संस्थेचे चेअरमन तुषार पवार यांनी उपोषणाचे अंदोलन हाती घेण्याचा इशारा दिला होता. पवार यांच्या या इशाऱ्यानंतर अहमदनगर जिल्हा बँक आणि प्रशासन चांगलेच वठणीवर आले. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या आदेशानंतर नान्नज सोसायटीचा क.म. प्रस्ताव मंजुर झाला असुन कर्ज वाटपास सुरूवात झाली आहे. ऐन बाजार समिती निवडणुकीत हा मुद्दा समोर आला. हा प्रश्न निकाली निघाल्याने तालुक्यातील सेवा संस्थेच्या कारभाऱ्यांचे बळ वाढवणारा ठरला आहे.
जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या इशाऱ्यावरून जामखेड तालुक्यातील अनेक सेवा संस्थांचे क.म प्रस्ताव मंजुर करण्यास जिल्हा बँक आणि जामखेड तालुका विकास अधिकारी कार्यालयाकडून टाळाटाळ होत असल्याची चर्चा तालुक्यात होत होती.अश्यातच जामखेडच्या राजकारणात बडे प्रस्थ असलेल्या माजी सभापती तुषार पवार यांच्या सेवा संस्थेचाही क.म.प्रस्ताव मंजुर करण्यास टाळाटाळ केली जात होती.
तुषार पवार यांनी याबाबत जामखेडचे सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांच्याकडे फोनद्वारे तक्रार केली होती, तरीसुद्धा हा प्रश्न निकाली निघाला नव्हता. यामुळे चिडलेल्या तुषार पवारांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. पवार यांच्या इशाऱ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या जिल्हा बँक आणि प्रशासनाने तात्काळ नान्नज सेवा संस्थेचा क.म.प्रस्ताव मंजुर केला.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी तातडीने माजी सभापती तुषार पवार यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत अहमदनगर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन नान्नज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. नान्नज ता. जामखेड जि. अहमदनगर या संस्थेचे क.म. प्रस्तावास मंजुरी देणेबाबत नियमाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
तसेच क.म. प्रस्ताव मंजुरीस टाळाटाळ करणाऱ्या बँकेच्या संबंधित तालुका विकास अधिकारी यांचेवर जिल्हा बँक कर्मचारी सेवा नियमाप्रमाणे आवश्यक कारवाई प्रस्तावित करण्यात यावी,असे आदेशात म्हटले आहे. आता जामखेड तालुका विकास अधिकारी यांच्यावर काय कारवाई होणार ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
आपल्या विरोधातील ज्या सेवा संस्था आहेत. त्यांना जिल्हा बँकेच्या संचालकांकडून त्रास दिला जात असल्याचेच यातून स्पष्ट झाले. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. भाजपकडून जिल्हा बँक संचालकाच्या दबावाच्या राजकारणाचे बुरखे फाडण्यास सुरुवात झाली आहे.