Ahmednagar District Hospital Agnitandav Update :अहमदनगर जिल्हा रूग्णालय अग्नीतांडव अपडेट : वडिलांना वाचवण्यासाठी आयसीयूमध्ये शिरलो होतो पण तोपर्यंत उशीर झाला होता 

मृतांची नावे जाहीर; मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Ahmednagar District Hospital Agnitandav Update । अहमदनगर जिल्हा आज एका दुर्दैवी घटनेने हादरला आहे. जिल्हा रुग्णालयातील ICU करोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली होती.या अग्नीतांडवात अत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या गंभीर घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी आदेश दिले आहेत.

अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील ICU कक्षामध्ये 25 जणांवर करोनाचे उपचार सुरू होते. त्याच कक्षाला आज सकाळी आग लागली. या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीररिय्या भाजले. आगीमुळे ICU कक्ष जळून खाक झाला आहे. प्रशासनाने 10 मृतांची नावे जाहीर केले आहेत. जिल्हा रुग्णालयाचा आवारात रुग्णांच्या नातेवाईकांच्या आक्रोश सुरू आहे. घटनेनंतर राजकीय नेते व कार्यकर्ते रूग्णालयात दाखल झाले त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरहून अहमदनगरला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेसंबंधी मुख्यमंत्र्यांनी शोक संवेदना व्यक्त केली असून या घटनेची सखोल चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. दरम्यान  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हेही घटनास्थळाच्या पाहणीसाठी रवाना झाले आहेत.

मात्र वडिलांना वाचवू शकलो नाही

विवेक खाटिक यांच्या वडिलांचा आगीत होरपळल्यानं मृत्यू झाला. ते गेल्या १० दिवसांपासून उपचार घेत होते. विवेक यांचे वडील कडूबाळ गंगाधर खाटिक (वय ६५ वर्षे) यांचा रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डला लागलेल्या आगीत मृत्यू झाला. ‘आग लागली त्यावेळी आई वडिलांजवळ होती. मी बाहेर आलो होतो. आग लागल्याचं समजताच मी रुग्णालयात धाव घेतली. मात्र वडिलांना वाचवू शकलो नाही,’ असं विवेक यांनी सांगितलं.

VIDEO: पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता

“आयसीयूला आग लागताच आधी आईला बाहेर काढण्यात आलं. मी त्यावेळी बाहेर होतो. मी पळत पळत रुग्णालयात आलो. आगीची तीव्रता जास्त असल्यानं आई मला आता जाऊ देत नव्हती. पण तरीही मी आत गेलो. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, अशा शब्दांत विवेक यांनी घडलेला प्रसंग सांगितला.

आगीत चार महिला व सहा पुरुषांचा मृत्यू

रामकिसन विठ्ठल हरपुडे (वय ७०), सिताराम दगडू जाधव (८३), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (६५), कडूबाळ गंगाधर खाटीक (६५), शिवाजी सदाशिव पवार (८२), दीपक विश्वनाथ जेडगुले (५७), कोंडाबाई मधुकर कदम (७०), आसराबाई नांगरे (५८ ), छबाबी अहमद सय्यद (६५) व एक अनोळखी. ”

हिवरे बाजारचे सरपंच तथा पद्मश्री पोपटराव पवार हे उद्या दिल्लीला जाणार असल्याने कोरणा टेस्ट करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. ते बाहेर उभे असतानाच कक्षाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोकरणा हेही त्यांच्या दालनामध्ये होते. पोपटराव पवार यांना ही आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले. पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, महापालिकेचे आयुक्त यांच्यासह सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले व यंत्रणा हलवली.

त्यामुळे अग्निशमन दल,  जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी  धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आयसीयू रुग्ण भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आलं आणि तातडीने त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.