अहमदनगर : दिव्यांगांचे गावनिहाय सर्वेक्षण करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे प्रशासनाला आदेश, “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” मोहिम होणार सुरू !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध अडचणींची सोडवणूक होण्यासाठी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हे अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी अभियानाचे काटेकोरपणे नियोजन करावे. दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा (Disability Welfare Department Scheme) लाभ मिळवून देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांगांचे गावनिहाय सर्व्हेक्षण (village-wise survey of disabled in Ahmednagar district) विहित वेळेत पुर्ण करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Collector Siddharam Salimath) यांनी दिले.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” या अभियानाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. बैठकीस महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे,नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त प्रशांत खांडकेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ गुरवले, जिल्हा दिव्यांग निर्मूलन केंद्राचे समन्वयक दीपक अनाप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या धर्तीवर “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगत, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, दिव्यांगांना दैनंदिन जीवनातील अनेक अडचणींबरोबरच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र, शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र यासारखी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांगांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावीत यासाठी जिल्हास्तरीय शिबीराच्या आयोजनाचे सर्व विभागांनी एकत्रितपणे व समन्वय साधत काटेकार नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांच्या समस्या सोडवुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना देण्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे गाव, वाडीनिहाय सर्व्हेक्षण विहित वेळेत करण्यात यावे. या कामामध्ये ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य यंत्रणा तसेच आयसीडीएस यांचा सहभाग घेण्यात यावा. दिव्यांगांच्या असलेल्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण होईल, यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी काम करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
समाजकल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.