जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट झाल्याचे सातत्याने समोर येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून यासंदर्भात सातत्याने धडक कारवाया पार पाडल्या जात आहेत, तरीही गावठी कट्ट्यांच्या विक्रीचे रॅकेट जिल्ह्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
गावठी कट्टे विक्रीसाठी अहमदनगर शहरात आलेल्या एकास बेड्या ठोकण्याची यशस्वी कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज पार पाडली. ही कारवाई अहमदनगर शहराबाहेरील बायपास परिसरात करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाकडून चार गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत.
औरंगाबादच्या गंगापूर येथील महेश काळे हा युवक नगर शहरात गावठी कट्टे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने नगर औरंगाबाद रोडवरील बायपास चौकामध्ये सापळा रचून महेश काळे यास ताब्यात घेतले.
महेश काळे यांच्याकडून चार गावठी कट्ट्यांसह आठ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत. महेश काळे हा कोणाला गावठी कट्टे विक्रीसाठी आला होता ? यापुर्वी त्याने कोणा – कोणाला कट्टे विकले ? गावठी कट्टे तो कोठून आणायचा ? काळे हा संघटीत टोळीचा भाग आहे का ? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सोपान गोरे, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, सुनिल चव्हाण, मनोज गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक शंकर चौधरी, रवि सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल आकाश काळे, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.