Ahmednagar lockdown news today | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला : अहमदनगर जिल्ह्यातील 21 गावांमध्ये लाॅकडाऊन जाहीर
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Ahmednagar lockdown news today | अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे ती गावे लाॅकडाऊन करण्याचा धडाका लावला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 21 गावे लाॅकडाऊन करण्याचा निर्णय बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.( Corona outbreak increases: Lockdown announced 21 villages Ahmednagar district)
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही सुरूच आहे असे काही तज्ञ म्हणतात, तर काही जण तिसरी लाट सक्रीय झाल्याचे म्हणतात. त्यातच सरकारने आता राज्यात निर्बंध हटवले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.असे चित्र असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे.कोरोना रूग्ण संख्या वाढलेल्या गावांमध्ये लाॅकडाऊन घोषित करण्याचा धडाका प्रशासनाने हाती घेतला आहे.बुधवारी जिल्ह्यातील 21गावांमध्ये लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर 8 गावांमध्ये मायक्रो कंटनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.या भागात पुढील दहा दिवस अत्यावश्यक सेवा वगळता गाव पुर्णता लाॅकडाऊन असणार आहे. पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
21 गावांमध्ये जिल्हा प्रशासनाने जाहीर केला लाॅकडाऊन
1) अकोले – वीरगाव, सुगाव बुद्रूक, कळस बुद्रूक
2) कोपरगाव – टाकळी
3) नेवासा – चांदा
4) पारनेर – जामगाव, वासुंदे
5) संगमनेर – उमरी, वेल्हाळे, चंदनापुरी, वडगाव पान, राजापूर, नांदूरी दुमाला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बुद्रूक, जोर्वे
6) नगर – पिंपळगाव माळवी
7) श्रीगोंदा – लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ
वरिल 21 गावांमध्ये दि 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत लाॅकडाऊन असणार आहे. किराणा दुकाने रोजी सकाळी 08 ते 11 या वेळेतच सुरू राहणार आहेत. तसेच शाळा व धार्मिक स्थळे लाॅकडाऊन काळात बंद असणार आहेत. लग्नसमारंभास परवानगी असणार नाही. तसेच अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल असे जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.
08 गावांमध्ये जाहीर करण्यात आले मायक्रो कंटनमेंट झोन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील आणखी आठ गावांमध्ये मायक्रो कंटनमेंट झोन घोषित केला आहे.
1) पारनेर – निघोज
2) संगमनेर- घुलेवाडी, घारगाव, गुंजाळवाडी
3) श्रीगोंदा – काष्टी
4) राहता – लोणी खुर्द, लोणी बुद्रूक, कोल्हार बुद्रूक
वरिल गावांमध्ये जास्त रूग्ण संख्या असलेला परिसर, वाडी वस्ती चा कंटनमेंट झोन घोषित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. या भागातील किराणा दुकाने सकाळी 08 ते 04 या वेळेत सुरू राहतील.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक गावांमध्ये कोरोनाचा वाढणारा उद्रेक डोकेदुखी ठरू लागला आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांकडे दुर्लक्ष करू नये असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.