अहमदनगर : राहुरीच्या कात्रड गावातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट, फरार आरोपीचा मृतदेह आढळला, नेमकं काय घडलयं? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील कात्रड (ता राहूरी) या गावात पत्नी व सासूची हत्या (Rahuri Katrad Murder case) झाल्याचा प्रकार बुधवार समोर आला होता. या प्रकरणातील फरार आरोपी सागर साबळे (Sagar sabale) याने घटनेनंतर टोकाचे पाऊल उचलत स्वता: आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राहुरी तालुक्यातील कात्रड गावात मंगळवारी मध्यरात्री सागर सुरेश साबळे (Sagar sabale) याने पत्नी नुतन सागर साबळे ( nutan sable) (वय 27) व सासू सुरेखा दिलीप दांगट (Surekha dangat) (वय 45) या दोघी झोपेत असतानाच त्यांची हत्या केली होती. दोघींच्या डोक्यात त्याने लोखंडी रॉडने (पहार) हल्ला करत हे हत्याकांड घडवून आणले होते. घटनेनंतर आरोपी सागर साबळे हा फरार झाला होता. मात्र बुधवारी सागर साबळे याने अहमदनगर एमआयडीसी हद्दीत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती राहूरी पोलिसांनी दिली.
राहूरीच्या कात्रड गावात पतीने बायकोसह सासूची हत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली होती.या प्रकरणातील आरोपी सागर साबळे हा कात्रड गावात घरजावाई म्हणून राहत होता.पत्नी व सासूची हत्या केल्यानंतर आरोपीने आपली मुलगी भावाकडे नेऊन ठेवली व तो तेथून निघून गेला. अचानक मुलीला आपल्याकडे आणून का सोडले म्हणून सागरच्या भावाने सागरच्या मुलीला घेऊन रात्रीच सागरचे घर गाठले.
सागरच्या घरी गेल्यावर त्याच्या भावाने हादरवून टाकणारी घटना पाहिली. सागरच्या घरात सागरची पत्नी व सासू रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. घरात दोघींचे मृतदेह आढळून येताच आरोपीच्या भावाने सदर घटनेची माहिती राहूरी पोलिसांना कळवली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे,पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी फौजफाट्यासह धाव घेतली.
दरम्यान, बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाबाबत अधिकार्यांना सुचना दिल्या. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.
मायलेकींच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या सागर साबळे याच्या अटकेसाठी राहूरी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कसून शोध सुरू केला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास सागर साबळे बाबत पोलिसांना माहिती मिळाली खरी पण तो मृतावस्थेत असल्याचे समोर आले.
सागर साबळे याने केली आत्महत्या
कात्रड दुहेरी खून प्रकरणातील आरोपी सागर साबळे याने अहमदनगर एमआयडीसी हद्दीतील धनगरवाडी भागातील एका चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी दुपारी उघडकीस आले. सागर याने पत्नी व सासूची कोणत्या कारणातून हत्या केली याचा उलगडा होण्या आधीच त्याने आत्महत्या केली. त्यामुळे कात्रड दुहेरी हत्याकांडाचे कारण मात्र गुलदस्त्यात राहिले आहे.
राहूरी तालुक्याचे लागले लक्ष
दरम्यान, राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील मायलेकीचे हत्याकांड कोणत्या कारणातून झाले, याचा शोध लावण्याचे मोठे अव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलिस तपासात काय उघडकीस येते याकडे राहूरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.