अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई : १०५ गुन्ह्यातील ९५ आरोपींना अटक; १६ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदी सप्ताहात अवैध दारू विक्री विरोधात १०५ गुन्हे नोंदवून ९५ आरोपींना अटक केली आहे. १६ लाख २७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात २ ते ८ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत दारूबंदी सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहात अवैध मद्यविक्री, वाहतूक, तसेच हातभट्टीवरील दारुविक्री, निर्मिती व अवैध ताडी विक्री विरोधात प्रभावीपणे कारवाई करण्यात आली.
याकाळात १०५ गुन्ह्यांची नोंद करुन ९५ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यात देशीदारू – ३५४.०२ लीटर, विदेशीदारू- ११८.८८ लीटर, बिअर- १६.२५ लीटर, रसायन -१८०१० लीटर. हातभटटी दारु- १२०० ली व ताडी- ६५ लीटरसह १६ वाहने असा एकूण १६ लाख २७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे पुणे विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश द. पाटील व उप अधीक्षक नितेश बी. शेंडे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आली.
अवैध मद्य, हातभटटी दारुवर यापुढे सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हॉट्सअप क्रमांक ८४२२००११३३ वर अवैद्य मद्याच्या तक्रारी नोंदवाव्यात. असे आवाह पाटील यांनी केले आहे.