अहमदनगर अपडेट : अहमदनगर दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, राजेश टोपे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब थोरात, रोहित पवार काय म्हणाले ? वाचा सविस्तर

मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने केली प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील ICU करोना कक्षाला लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा बळी गेला आहे. या दुर्दैवी घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

राज्य सरकारने अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश जारी केले आहेत. तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केली आहे.(An emergency relief of Rs 5 lakh has been announced for families of the victims of the fire in ahmednagar)

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कोविडच्या अतिदक्षता विभागात 17 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील दहा जणांचा आज सकाळी अकराच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा पुरूष व चार महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले

आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली आहे. या दुर्घटनेत 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 06 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे. या दुर्घटनेची चौकशी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली.

अहमदनगर दुर्घटनेतील मृतांची नावे

दरम्यान, या आगीत रामकिसन विठ्ठल हरपुडे (वय 70, माका, ता. नेवासे), सीताराम दगडू जाधव (वय 83, बख्तरपूर, ता. शेवगाव), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (वय 65, तेलकुडगाव, ता. नेवासे), कडूबाळ गंगाधर खाटिक (वय 65, पाथरवाला, ता. नेवासे), भिवाजी सदाशिव पवार (वय 80, किन्ही, ता. पारनेर), दीपक विश्वनाथ जेडगुले (वय 37, अश्वी, ता. संगमनेर), कोंडाबाई मधुकर कदम (वय 70, केडगाव, ता. नगर), आसराबाई गोविंद नांगरे (वय 58, शेवगाव, ता. शेवगाव), छबाबी अहमद सय्यद (वय 65, शेंडी, ता. नगर) आणि एक अनोळखी व्यक्ती यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, या अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट झालेले होते. नातेवाईकांच्या तक्रारी नुसार चौकशी होईल. रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य ती मदत दिली जाईल. या संदर्भात माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झालेले आहे. या घटनेमुळे अतिदक्षता विभागातील 1 रुग्ण खासगी रुग्णालयात तर इतर रुग्ण जिल्हा रुग्णालयातीलच इतर विभागांत हलविण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

अहमदनगर दुर्घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेसंबंधी मुख्यमंत्र्यांनी शोक संवेदना व्यक्त केली असून या घटनेची सखोल चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून सदर घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी  परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातील अन्य रुग्णांच्या सुरक्षिततेची व आरोग्यसेवेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात घडलेल्या भीषण अग्नीतांडवाच्या घटनेसंबंधी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे अशी प्रार्थना मोदी यांनी केली आहे.

गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केले दुःख

अहमदनगर, महाराष्ट्रातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या हृदयद्रावक घटनेमुळे अतिशय दु:ख झाले आहे. या दु:खाच्या प्रसंगी, माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत आणि मी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.

महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांनी दिली जिल्हा रुग्णालयाला भेट

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागून झालेली दुर्घटना सुन्न करणारी आहे. घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. मृत रुग्णांच्या कुटुंबीयांचे दुःख मोठे आहे, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केली आहे. दरम्यान थोरात यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून दोषी असणाऱ्यांचा शोध घेतला जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख व NDRF मधून दोन लाख अशी सात लाख रुपये मदत दिली जाईल अशी घोषणा थोरात यांनी केली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली सखोल चौकशीची मागणी

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटलांनी केले दु:ख व्यक्त

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अहमदनगर दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. यासंबंधी त्यांनी ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला आग लागल्याची धक्कादायक घटना आताच ऐकिवात आली. रुग्णालयाला आग लागण्याच्या घटना सतत घडत असूनही राज्य प्रशासन अजूनही निद्रस्त आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. प्रशासनाने आतातरी त्वरित योग्य कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले दु:ख

अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेने अत्यंत दुःख झालं. याबाबत सरकार निश्चित चौकशी करेल,असा विश्वास आहे. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.