… अन अजित पवारांनी हात जोडले ! राजेंद्र पवारांच्या भाषणावरून अजित पवारांनी काढले जोरदार चिमटे आणि सभागृहात जोरदार हशा पिकला
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : आज दिवाळीच्या सणाच्या दिवशी आमच्या बंधुराजांची गाडी जोरात होती असं म्हणत त्यांनी राजेंद्र पवार यांनी काढलेल्या चिमट्यांवर हात जोडत तुमच्या बोलण्याची नोंद घेतली असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
आमदार रोहित पवार यांचे पिताश्री तथा अजित पवार यांचे थोरले बंधू राजेंद्र पवार यांनी बारामतीत बोलताना जोरदार बॅटिंग करत सरकारच्या धोरणांची चिरफाड केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आज दिवाळीच्या सणाच्या दिवशी बंधुराजांची गाडी जोरात होती असं म्हणत त्यांनी राजेंद्र पवार यांनी काढलेल्या चिमट्यांवर हात जोडत तुमच्या बोलण्याची नोंद घेतल्याचं म्हटलं. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही हसू आवरले नाही. अजित पवार बारामतीतील इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “मी आमच्या बंधुंचं भाषण ऐकत होतो. दिवाळीचा सण आहे आणि आज गाडी इतका जोरात होती की मला काही कळलंच नाही. समोर मी बसलोय, शरद पवार साहेब बसलेत, सुप्रिया बसलीय पण बाबा थांबायलाच तयार नव्हता. मी म्हटलं अरे बाबा आपल्याला कामं कुणाकडून घ्यायची असतील तर पार त्याचं उभं आडवं करून त्याच्याकडून कसं काम होणार? बंधुराज जी नोंद घ्यायची ती घेतली”, असे म्हणत अजित पवारांनी हात जोडत मोठ्या भावाला सांगितलं
काम थोडं गोड बोलून, थोडं गोंजरत गोंजरत एखादा चिमटा काढत करून घ्यायचं असतं. पण सारखं इकडे चिमटे तिकडे चिमटे. म्हटलं झालं काय काय आज? पण जाऊ दे आता जास्त बोलत नाही. कारण दिवाळीचा सण आहे. असं अजित पवार म्हणाले.
“पण बंधुराज जी काही नोंद घ्यायची ती घेतलेली आहे एवढंच सांगतो. जेवढं करता येणं शक्य असेल तेवढं मुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असतात. ते सर्व आम्ही सर्वजण निश्चित प्रयत्न करू,” असं हात जोडत केलेल्या टोलेबाजीनंतर सभागृहात एकच हशा पिकला होता
अजित पवार यांनी राजेंद्र पवार यांना टोले लगावल्यानंतर यावर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “दादा आपण आपल्या बंधूंच्या मनोगताबद्दल बोललात. ते तुम्ही दोघं ठरवा आणि काय काय करायचं, काय काय बाकी आहे हे मला सांगा. त्यांनी आडकाठी आणली की मला सांगा. म्हणजे मी पवार साहेबांकडे जाऊन ती कामं करून घेतो.”