खा. सुजय विखे यांच्या पुढाकाराने कर्जतच्या प्रबोधनकार प्रतिष्ठानला रुग्णवाहिका सुपूर्द, राम शिंदेंच्या हस्ते पार पडला लोकार्पण सोहळा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । खासदार डाॅ सुजयदादा विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून कर्जतकरांच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल झाली आहे. माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा राशीन येथे पार पडला अशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी दिली.

भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे अध्यक्ष असलेल्या प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठाण कर्जत या संस्थेने गेल्या काही वर्षांत सामाजिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. या संस्थेच्या कामाची दखल घेत खासदार सुजय विखे पाटील यांनी या संस्थेसाठी आपल्या स्थानिक विकास  निधीतून एक रुग्णवाहिका भेट दिली आहे. या रूग्णवाहिकेचा उपयोग कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र राशीन येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते सदर रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडे रूग्णवाहिकेच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

प्रबोधनकार प्रतिष्ठानच्या माध्यमांतून गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत तालुक्यात सामाजिक कार्य चालू असून 13 रक्तदान शिबिरे ,देशासाठी शाहिद झालेल्या शहीद जवानांच्या 9 मातांना ” वीरमाता पुरस्कार, विद्यार्थ्यांत्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम, व्यख्यान, प्रवचन, कीर्तन,कुळधरण रोडवरील शहाजी नगर व प्रभात नगर यामधील 500 मीटर नदीचे स्वछता, खोलीकरण , व सुशोभीकरण, माजी मंत्री श्री.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडलेले TV 9 चे पत्रकार कै.पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना 51000 ची मदत , सुपे गावात गरजवंतांना ब्लँकेट वाटप , पत्रकार दिन असे अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.

खासदार सुजय विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमांतून कर्जत व परिसरातील ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांना नाममात्र दरात सेवा देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सचिन पोटरे म्हणाले. रुग्णवाहिकेच्या संपर्कासाठी संतोष खराडे – 9960275767, श्रीकांत पोटरे-9614219292, श्रीकृष्ण पोटरे-9095765555 यांच्या संपर्क साधण्याचे आवाहन सचिन पोटरे यांनी केले आहे.