जामखेड : खर्ड्याच्या राजकीय लढाईत भाजपकडून राष्ट्रवादीचा गड उध्वस्त, आमदार राम शिंदेंकडून पुन्हा एकदा आमदार रोहित पवारांना दे धक्का, भाजपचा बालेकिल्ला पुन्हा भाजपच्या ताब्यात !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । मागील तीन वर्षांपासून आमदार प्रा.राम शिंदे व आमदार रोहित पवार (MLA Ram Shinde vs MLA Rohit Pawar) या दोन नेत्यांमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघावर कब्जा प्रस्थापित करण्यासाठी (Karjat Jamkhed) राजकीय संघर्ष तापलेला आहे, परंतू नुकत्याच पार पडलेल्या जामखेड बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रा राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांना धोबीपछाड देत बाजार समितीवर कब्जा मिळवला. त्यानंतर आता जामखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या खर्डा ग्रामपंचायतीच्या (Kharda GramPanchayat Sarpanch Election Results) सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपने (BJP) राजकीय चमत्कार घडवला आहे.खर्डा ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवाराचा पराभव केला.भाजप विरूध्द राष्ट्रवादी या खर्ड्याच्या राजकीय लढाईत भाजपने राष्ट्रवादीचा गड उध्वस्त केला आहे. या निकालामुळे राष्ट्रवादी अर्थात आमदार रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात सबकुछ राष्ट्रवादी असे चित्र निर्माण झाले होते.भाजपातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरु झाले होते. 25 वर्षे भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या कर्जत-जामखेड भाजपात मोठ्या प्रमाणात मरगळ आली होती.मात्र गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर झाले. महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना प्रा राम शिंदे विधानपरिषदेवर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.राज्यात सत्तांतर घडले. भाजपा – शिवसेना (शिंदे गट) सत्तेवर आले. राज्यात सत्तांतर होताच कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपात नवऊर्जा संचारली. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील इनकमिंग मोहिम गतिमान झाली.करोडोंचा निधी मतदारसंघात येण्यास प्रारंभ झाला. मतदारसंघात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर वन ठरली. बाजार समिती निवडणुकीतही भाजपने मुसंडी मारली. जामखेड बाजार समिती भाजपच्या ताब्यात आली. आता कर्जत बाजार समितीवर कब्जा मिळवण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे.
भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या खर्डा भागात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला होता. जामखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या खर्डा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने कब्जा केला होता, आपल्या पूर्वीच्या बालेकिल्ल्यावर पुन्हा कब्जा मिळवण्यासाठी भाजप संधीच्या शोधात होती. काही दिवसांपुर्वी खर्डा ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या सरपंच नमिता आसाराम गोपाळघरे व उपसरपंच रंजना श्रीकांत लोखंडे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. गोपाळघरे आणि लोखंडे यांच्या राजीनाम्यानंतर खर्डा ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवण्याची संधी भाजपकडे चालून आली होती. या संधीचे सोने करण्यासाठी भाजप सरसावली होती. सरपंच व उपसरपंच यांच्या राजानाम्यानंतर दोन्ही गटाचे सदस्य सहलीवर रवाना झाले होते. राष्ट्रवादीकडे 9 तर भाजपकडे 8 चे संख्याबळ होते.
जामखेड तालुक्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या खर्डा ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविण्यासाठी सरसावलेल्या भाजपने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गुप्तपणे राजकीय सोंगट्या फिरवण्यास सुरुवात केली होती. खर्डा ग्रामपंचायतवर सत्ता मिळवण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन कमळची जबाबदारी भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांच्या खांद्यावर होती. त्यांच्या मदतीसाठी खर्ड्यातील इतर भाजपा नेते होते. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सरांचीही या मोहिमेत मोठी मदत झाली. त्यामुळे भाजपने आखलेला गेम प्लॅन यशस्वी झाला.भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार संजीवनी वैजीनाथ पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार रोहिणी प्रकाश गोलेकर यांचा एका मताने पराभव केला.गुप्त मतदानात राष्ट्रवादीचे एक मत फोडण्यात भाजप यशस्वी ठरली. राष्ट्रवादीकडे सत्तास्थापनेचे संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीचा धक्कादायक पराभव झाला. खर्ड्याच्या राजकीय लढाईत राष्ट्रवादीचा गड उध्वस्त करण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. या निकाला मुळे भाजपचा बालेकिल्ला ही खर्ड्याची ओळख पुन्हा प्रस्थापित झाली आहे.
भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब
खर्डा ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवण्यासाठी भाजपा नेते रविंद्र सुरवसे व राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह गोलेकर या दोन्ही नेत्यांनी आपल्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. त्यामुळे खर्ड्याचा सरपंच भाजपचा होणार की राष्ट्रवादीचा होणार ? याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते. 17 सदस्य संख्या असलेल्या खर्डा ग्रामपंचायतीचे 9 सदस्य राष्ट्रवादीच्या बाजूने तर 8 सदस्य भाजपच्या बाजूने सहलीवर रवाना झाले होते. त्यामुळे संख्याबळानुसार राष्ट्रवादीचा सरपंच होईल असे प्राथमिक चित्र होते.
परंतू भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या ऑपरेशन कमळला कमालीचे यश मिळाले. गुप्त मतदानात राष्ट्रवादीच्या एका सदस्याने भाजपला मदत केली. भाजपच्या उमेदवाराला ही मदत मिळवून आणण्यात रविंद्र सुरवसे यांनी आखलेली व्यूहरचना प्रचंड यशस्वी ठरली. राष्ट्रवादीतील गटबाजीचा भाजपने फायदा उचलत ग्रामपंचायतीवर कब्जा.खर्डा सरपंचपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांच्या कुशल नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
भाजपच्या चमत्काराने राष्ट्रवादीचा गड उध्वस्त
17 सदस्य संख्या असलेल्या खर्डा ग्रामपंचायतची दोन वर्षापुर्वी निवडणुक पार पडली होती, यात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत 10 जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवला होता. या निवडणुकीत भाजपचा 7 जागांवर विजय झाला होता.खर्डा ग्रामपंचायतवर सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादीत दोन आणि तीन वर्षाचा पद वाटपाचा फाॅर्म्यूला ठरला होता. दोन वर्षे झाल्यानंतर सरपंच नमिता गोपाळघरे आणि उपसरपंच रंजना लोखंडे यांनी राजीनामा दिला होता. नव्या सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी राष्ट्रवादीत हालचाली सुरु झाल्या होत्या.परंतू या निवडीत भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी एन्ट्री करत सरपंच भाजपचाच होणार अशी घोषणा केली होती.भाजप ॲक्टिव्ह होताच राष्ट्रवादी सतर्क झाली होती. ग्रामपंचायत सदस्य फोडाफोडीला सुरुवात झाली होती. भाजपने राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना आपल्या कळपात ओढत राष्ट्रवादीला धक्का दिला होता, परंतु राष्ट्रवादीने भाजपचा एक सदस्य आपल्या गळाला लावत जोरदार प्रत्यत्तर दिले होते. त्यानंतर 8 सदस्या घेऊन भाजप तर 9 सदस्यांना घेऊन राष्ट्रवादी सहलीवर रवाना झाली होती. परंतू सरपंच पदाच्या प्रत्यक्ष निवडणूक भाजपने राजकीय चमत्कार घडवत राष्ट्रवादीचा एक सदस्य फोडला. फुटलेल्या त्या सदस्याने गुप्त मतदानात भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. त्यानुसार एका मताने भाजपच्या संजीवनीताई वैजीनाथ पाटील सरपंचपदी विजयी झाल्या.
भाजपचा बालेकिल्ला पुन्हा भाजपच्या ताब्यात
खर्डा परिसर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्यात भाजपचा पहिला जिल्हा परिषद सदस्य याच भागाने निवडून दिला आहे. स्व गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा मोठा मतदार या भागात आहे. सातत्याने या भागाने भाजपच्या बाजूने भरभरून मतदान केले आहे.खर्डा परिसराला भाजपची वोट बँक म्हणून ओळखले जाते. मध्यंतरी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या भागात पहिल्यांदा भाजपची पिछेहाट झाली. राष्ट्रवादीने या भागात निर्णायक मते घेतली. परंतु गेल्या तीन वर्षात ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे राष्ट्रवादीचा जनाधार घटू लागला आहे. आता तर खर्डा ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला पुन्हा भाजपकडे गेला आहे. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खर्ड्यात आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेले सत्तांतर भाजपचे राजकीय बळ वाढवणारे ठरले आहे.
खर्ड्यात भाजपचा विजयी जल्लोष
खर्डा ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार संजीवनीताई वैजीनाथ पाटील यांच्या विजयाची घोषणा होताच भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी खर्डा शहरात फटाक्यांची आतिषबाजी अन् गुलालाची उधळण करत जोरदार विजयी जल्लोष केला. या विजयी जल्लोषात जामखेड तालुका भाजपचे बहुतांश नेते सहभागी झाले होते. यामध्ये या विजयाचे शिल्पकार रविंद्र सुरवसे,भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, जामखेड बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील, नंदकुमार गोरे, तालुका सरचिटणीस लहू शिंदे, बाजीराव गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे,बाळासाहेब गोपाळघरे, बिभीषण धनवडे, माजी सरपंच संजय गोपाळघरे, नितीन सुरवसे, आप्पासाहेब ढगे सह आदी नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जामखेड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीवर भाजपचा कब्जा
जामखेड तालुक्याच्या राजकारणात अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीबरोबर गुरेवाडी – महारूळी या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आज निवड होती. राष्ट्रवादीच्या सरपंच अंजली लक्ष्मण ढेपे यांनी काही दिवसांपुर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सात सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीवेळी पाच सदस्य हजर होते. माजी सरपंच अंजली ढेपे व सोनाली जाधव हे दोन सदस्य गैरहजर होते. सरपंचपदासाठी संतोष बबन ठाकरे यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांच्या नेतृत्वाखाली गुरेवाडी – महारुळी ग्रामपंचायतीवर भाजपने आपला झेंडा फडकावला.