Ankita Patil : हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचा अजित पवारांवर गंभीर आरोप, बारामती लोकसभेचे राजकीय वातावरण तापले !
Ankita Patil : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अश्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील (Harshvardhan Patil daughter Ankita Patil) यांनी केलेले एक वक्तव्य आता चर्चेत आले आहे. त्यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अंकिता पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चांनी जोर धरला आहे.
महाविकास आघाडीत असताना अजित पवार यांनी आम्हाला तीनदा शब्द दिला, पण त्यांनी तो शब्द पाळला नाही. त्यांनी आमची फसवणूक केली, आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा खळबळजनक आरोप अंकिता पाटील (Ankita Patil)) यांनी केला आहे.
अंकिता पाटील पुढे म्हणाल्या की, आता आम्ही महायुतीत आहोत. पण विधानसभेला जे आमचं काम करतील त्यांनाच आम्ही लोकसभेला मदत करू असे म्हणत पाटील यांनी लोकसभेच्या आखाड्यातून आमदारकीची बांधणी हाती घेतल्याचे स्पष्ट होत आहे. बारामती लोकसभेच्या जागेवरून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या गटामध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे. अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून बारामतीतील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.सध्या घडत असलेल्या घडामोडींवरून पवार आणि पाटील गटांमध्ये आणखीन अंतर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीत राष्ट्रवादीचा मेळावा घेत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचे जाहीर केले. हे जाहीर करताना लोकसभेचा उमेदवार निवडून दिला तरच विधानसभा निवडणुक लढवणार अशी घोषणा केली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवार असतील असेच संकेत अजित पवारांनी बारामतीच्या मेळाव्यातून दिले. बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या इंदापूर मतदारसंघात याचे पडसाद उमटले आहेत.
इंदापूर या मतदारसंघात पुर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आमदार असायचे पण त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत दत्ता मामा भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला होता. पाटील यांचा पराभव अजित पवार यांनीच घडवून आणला होता, असे सातत्याने बोलले जाते. 2024 ची विधानसभा पुर्ण ताकदीने लढवण्याची तयारी हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाने हाती घेतली आहे.
अंकिता पाटील यांनी आधी लोकसभेची तयारी हाती घेतली होती, परंतू अजित पवार यांचा महायुतीत समावेश झाला. बारामतीची जागा ते आपल्याकडे ठेवून या जागेवर सुनेत्रा पवार यांना मैदानावर उतरवणार असे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे अंकिता पाटील यांचे नाव लोकसभेच्या शर्यतीतून मागे पडले आहे. आता अंकिता पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी अजित पवारांनी पाटील कुटूंबाची तीनदा फसवणूक केल्याची गोष्ट जगजाहीर करून पक्षाला आणि अजित पवारांना द्यायचा तो संदेश दिला आहे.
अंकिता पाटील काय म्हणाल्या ?
महाविकास आघाडीत असताना अजित पवारांनी आम्हाला तीनदा शब्द दिला, शब्द देऊन तो फिरवण्यात आला, आमची फसवणूक करण्यात आली. आमच्या पाठीत खंजीर तपासण्यात आला. आता आम्ही महायुतीमध्ये आहोत .त्यामुळे विधानसभेला जे आमचे काम करतील, त्यांना आम्ही लोकसभेला मदत करू, असा इशारा यावेळी अंकिता पाटील यांनी बोलताना दिला आहे. त्याबरोबर हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनीही एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, काहीही झालं तरी आम्ही इंदापूरची विधानसभा निवडणूक लढवणारच.