जामखेड : रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजला मंजुरी, चालु शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू – डाॅ भास्कर मोरे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजला केंद्र शासनाच्या भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग,आयुष मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली,वैद्यकीय शिक्षण विभाग,महाराष्ट्र शासन,मुंबई व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 पासुन शंभर विद्यार्थी क्षमतेसह मंजुरी दिली आहे. त्यानुसार शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत चालु शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे व सेक्रेटरी डॉ वर्षा मोरे यांनी दिली.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात बीएचएमएस,नर्सिंग व फार्मसी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असून याठिकाणी राज्यातील दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.चालु शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून संस्थेस आयुर्वेद (बीएएमएस) मेडिकल कॉलेज सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून त्यामुळे जामखेड-कर्जत तालुक्यातील वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी वैद्यकीय शिक्षणाची सोय होणार आहे.
रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचेमार्फत दिनांक 20 फेब्रुवारी 2023 ते 4 मार्च 2023 या काळात कॉलेज स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे अशी माहिती रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सर्फराज खान यांनी दिली आहे.