अहमदनगर जिल्ह्यात 1420 कोटींच्या नवीन रस्त्यांना मंजुरी, जामखेड – अहमदनगर रस्त्याचेही भाग्य उजळणार, नितिन गडकरींची घोषणा !
अहमदनगर : मराठवाड्यातील जनतेला पुणे – मुंबईला जोडणारा, तसेच दक्षिण भारतातील पर्यटकांना शिर्डीशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग (Highway) असलेल्या जामखेड ते अहमदनगर या रस्त्याचे भाग्य आता उजळणार आहे. सदर रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भरिव निधीची (funds) घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात 1420 कोटी रुपयांच्या नवीन रस्त्यांना मान्यता (approval) देण्यात आली आहे. त्यात जामखेड- अहमदनगर या रस्त्याचा समावेश आहे, अशी घोषणा नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अहमदनगरमध्ये (Ahmednagar) बोलताना केली आहे.
961 कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता, 980 कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर- मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी पॅकेज (एक) अहमदनगर ते घोगरगाव, व पॅकेज (दोन) घोगरगाव ते चापडगाव 1032 कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगरमध्ये पार पडले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
उद्योग आणि व्यापार क्षेत्राच्या विकासासाठी उत्तम रस्ते, दळणवळणाची साधने, वीज व पाणी या बाबींची आवश्यकता असते. पूर्वीच्या काळात अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी केवळ 202 किलोमीटर एवढीच होती. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातुन गेल्या दहा वर्षात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे वाढविण्यावर भर देत नव्याने 869 किलोमीटर लांबी वाढविण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात 12 हजार कोटी रुपयांची 21 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी 11 कामे पुर्ण करण्यात आली आहेत. 9 कामे प्रगतीपथावर आहेत. येणाऱ्या काळात ही कामे जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय वाढीस लागण्यास अतिशय उपयुक्त ठरतील, असा विश्वासही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
सुरत ते दक्षिणेतील राज्याला जोडणारा 80 हजार कोटी रुपयांचा नवीन रस्ता व पुणे ते छत्रपती संभाजीनगर रस्ता महाराष्ट्राचे भविष्य बदलणारे रस्ते ठरतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते, वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सुरत ते दक्षिण भारताला जोडणारा नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्ह्यातुन हा रस्ता जात असुन त्याची लांबी 482 किलोमीटर एवढी आहे.अहमदनगर जिल्ह्यातुन 141 किलोमीटर हा रस्ता जात आहे. त्यासाठी 1095 हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे.
तसेच पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा रस्ताही नव्याने तयार करण्यात येत असुन या रस्त्यामुळे केवळ दोन तासांमध्ये छत्रपती संभाजीनगरला पोहोचता येणार आहे. या दोन्ही रस्त्यांमुळे अहमदनगरच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील 3 नवीन रस्त्यांना मंजुरी
अहमदनगर जिल्ह्याचा चौफेर विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. 400 कोटी रुपये किंमतीचा माळशेज घाट, आणेघाट, अहमदनगर बायपास, खरवडी कासार जंक्शन सिमेंट काँक्रीटीकरण, 670 कोटी रुपयांच्या अहमदनगर ते सबलखेड, आष्टी व चिंचपूर तसेच 350 कोटी रुपयांचा नांदूर शिंगोटे ते कोल्हार या नवीन रस्त्यांच्या कामांना मान्यता दिली असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. या सर्व कामांसाठी 1420 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गडकरी पुढे म्हणाले, ग्रीन हायड्रोजन हीच भविष्यातील टेक्नॉलॉजी आहे. बायोमास्कपासुन मिथेन व मिथेनपासुन हायड्रोजन तयार करण्यात येणार आहे. या हायड्रोजनवर विविध कारखाने, केमिकल इंडस्ट्री, रेल्वे, ट्रक, बसेस तसेच विमानेसुद्धा या हाड्रोजनवर चालणार आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांनी ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.