Bhaskar More Vanvibhag News : विनयभंगाच्या गुन्ह्यासह वन्यजीव संरक्षण कायद्याखाली अटकेत असलेल्या डाॅ भास्कर मोरेला न्यायालयाने चार दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार दाखल गुन्ह्याचा वनविभाग कसून तपास करत आहे, अशी माहिती वन विभागाचे कर्जत उपविभागीय अधिकारी मोहन शेळके यांनी दिली. (Bhaskar more latest news today)
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर या वैद्यकीय शिक्षण संस्थेचा संस्थापक डाॅ भास्कर मोरे (Dr Bhaskar more) विरोधात रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांनी बंड पुकारत तीव्र अंदोलन हाती घेतले होते. 5 मार्च पासून सुरु झालेले हे अंदोलन 15 मार्च रोजी स्थगित करण्यात आले. 11 दिवसाच्या या अंदोलनात विद्यार्थ्यांनी डाॅ भास्कर मोरेंविरोधात केलेले गंभीर आरोप विविध चौकशी समित्यांच्या पाहणीत खरे ठरले. त्याचबरोबर एका विद्यार्थीनीने भास्कर मोरे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे रत्नदीपचे प्रकरण अधिकच तापले.
रत्नदीपचा संस्थापक डाॅ भास्कर मोरे हा आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक करून विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार करत असल्यामुळे रत्नदीपच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मोरे याच्या मनमानी कारभाराविरोधात अंदोलन छेडले होते. या अंदोलनास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संभाजी ब्रिगेड, मनसे, आप, आरपीआय सह आदी संघटनांनी सक्रीय पाठिंबा दिला. शिवप्रतिष्ठानच्या पांडुरंग भोसले यांनी आमरण उपोषण करत अंदोलनाला चांगलीच धार आणली. सर्वसामान्य नागरिकांनी या अंदोलनास मोठा पाठिंबा दिला. भास्कर मोरेच्या निषेधार्थ जामखेड बंदचे अंदोलन करण्यात आले होते.
भास्कर मोरेला तातडीने अटक करा आणि आमच्या शैक्षणिक मागण्या तातडीने मान्य करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे अंदोलन सुरु होते. विनयभंगाच्या गुन्ह्यात फरार झालेल्या भास्कर मोरेला 13 मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी भास्कर मोरे याला 15 रोजी ताब्यात घेतले. आज 16 रोजी मोरे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मोरे यास 4 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
काय आहे रत्नदीप प्रकरण ?
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात डाॅ भास्कर मोरे याने हरीण पाळले असल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. त्यानंतर वनविभागाने रत्नदीप शैक्षणिक संकुलाची पाहणी केली. या पाहणीत रत्नदीप परिसरात एक हरीण जखमी अवस्थेत वनविभागाला आढळून आले होते. त्यानंतर ते हरीण ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले. बेकायदेशीररित्या हरीण पाळल्याप्रकरणी वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार डाॅ भास्कर मोरे विरोधात 10 मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे भास्कर मोरे याने हरीण पाळले असल्याची तक्रारी वनविभागाकडे प्राप्त होत असतानाच मोरे याने रत्नदीप आवारात एक हरीण मारून पुरले आहे अशीही तक्रार वनविभागाकडे आली होती. त्यानुसार वनविभागाने रत्नदीप परिसरात जेसीबीच्या सहाय्याने खोदाई केली. दोन दिवसाच्या या कारवाईत काही प्राण्याचे केस आणि हाडे वनविभागाला सापडले. सापडलेला हा मुद्देमाल वनविभागाने पुढील तपासणीसाठी नागपुरच्या फाॅरेन्सिक लॅबला पाठवला आहे. वनविभागाला 15 रोजी रत्नदीप परिसरात प्राण्यांचे काही शिंगे आढळून आले आहेत. एकुणच रत्नदीपचे प्रकरण अतिशय गंभीर बनले आहे.
रत्नदीपमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या भास्कर मोरेविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात वनविभागाच्या तपासात सापडलेली हाडे, केस, शिंगे कोणत्या प्राण्याची निघतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. वन विभागाचे कर्जत उपविभागीय अधिकारी मोहन शेळके यांची वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. वनविभागाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे.