Shikshak Bharati 2023 : मोठी बातमी ! आजवरची सर्वात मोठी शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये रिक्त पदांची संख्या मोठी आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी सरकारने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहेत. सध्या महसुल विभागातील 4644 तलाठी पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच आता शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील सर्वात मोठी शिक्षक भरती राबणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केसरकर यांच्याकडून करण्यात आली आहे. शिक्षक म्हणून शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज असलेल्या डीएड बीएड धारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, राज्य सरकार लवकर 50 हजार शिक्षकांची भरती करणार आहे. ही आजवरची सर्वात मोठी शिक्षक भरती असणार आहे. या भरतीमुळे यापुढे शिक्षकांची कमतरता भासणार नाही. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
पुढे केसरकर म्हणाले की, सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. गणवेश वाटपाची जबाबदारी स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेशावाचून एकही विद्यार्थी वंचित राहत कामा नये, अश्या सुचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. याबाबतचे वृत्त हिंदूस्थान टाइम्सने दिले आहे.